सुरक्षा ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी : नविद मुश्रीफ

 

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथे ४ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते सुरक्षा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा प्रतिज्ञा घेत सुरक्षित कार्यसंस्कृती जपण्याचा संकल्प केला. चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “ राष्ट्रीय सुरक्षा दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची जाणीव दृढ करण्याचा दिवस आहे. सुरक्षा ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. आपण नियमांचे पालन केले, आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर केला आणि सतर्क राहिलो तर अपघात टाळता येऊ शकतात.” त्यांनी पुढे सांगितले की, उद्योगाची प्रगती कामगारांच्या सुरक्षिततेवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने व शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. या दिनानिमित्त सायबर महाविद्यालय कोल्हापूर येथील समाज कार्य विभागाच्या विद्यार्थांनी सुरक्षिततेवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्यातून कामाच्या ठिकाणी उद्भवू शकणारे धोके, आवश्यक खबरदारी, तसेच सुरक्षा साधनांचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी या सादरीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, रमेश पाटील, प्रताप पडवळ, बाजीराव राणे, शाहीर सदाशिव निकम, अमोल गडकरी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, सुरक्षा अधिकारी के.एस.कदम तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!