
कोल्हापूर:सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन जनसेवा करणाऱ्या पोलिसांना नेहमी सण समारंभाला मुकावे लागते. जनसेवेत २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांना राखीचा स्नेह धागा बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भागिरथी महिला संस्थेच्या वतीने यंदा सलग तेराव्या वर्षी शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना राखीचा पवित्र धागा बांधण्यात आला. या उपक्रमाचे पोलीस दलाकडून कौतुक करण्यात आले.कोल्हापुरातील भागिरथी महिला संस्थेच्या माध्यमातून अरुंधती महाडिक यांनी महिलांचे मोठे संघटन केले आहे. महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य या संस्थेच्या वतीने केले जाते. या संस्थेच्या वतीने दरवर्षी पोलिसांसाठी रक्षाबंधन या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा सलग तेराव्या वर्षी हा उपक्रम राबण्यात आला. बुधवारी सायंकाळी जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी आणि करवीर पोलीस ठाण्यात हा उपक्रम पार पडला. भागिरथी महिला संस्थेच्या सदस्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना पंचारतीने ओवाळून त्यांना राखीच्या बंधनाचा अतूट धागा बांधला.शहर आणि जिल्ह्यातील महिला, युवतींचे यापुढेही अशाच पद्धतीने पोलीस दलातील बांधवांकडून रक्षण व्हावे, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली. भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी महिलांचे सबलीकरण आणि उन्नतीसाठी सुरू केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून विधायक कार्य घडत असल्याचे गौरवोद्गार करवीरचे पोलीस उपाधीक्षक संकेत गुरव, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक संतोष जाधव, करवीरचे सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी काढले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी सदस्या संगीता खाडे, रंजना शिर्के, विद्या पाटील, वैशाली बेविनकट्टी, सविता हरूगले, मेघा क्षीरसागर, हेमा कुलकर्णी, कविता कोंडेकर, विद्या माळी यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या.
Leave a Reply