‘प्रीत अधुरी’ २३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीसाठी

 

कोल्हापूर: जवळपास गेल्या १५ वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दर्जेदार चित्रपट पाहिले. या काळामध्ये दर्दी चित्रपट रसिकांची आवड जशी बदलत गेली, तशीच ती चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकांकडून विषयाची निवडदेखील बदलत गेली. परिणामी प्रेमकथांसोबतच सामाजिक, राजकीय, कौटुंबिक विषयांना हात घालणारे अनेक दर्जेदार सिनेमे मराठी रसिकांना पाहायला मिळाले. या सगळ्या विषयांसोबतच काही हटके विषयदेखील चित्रपट रसिकांचं लक्ष आकर्षित करणारे ठरतात. अशीच एक हटके कथा घेऊन नवीन चित्रपट येत्या २३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘प्रीत अधुरी’! या चित्रपटातील कलाकारांनी कोल्हापुरात पत्रकारांशी मुक्त संवाद साधला.खरंतर चित्रपटाच्या नावावरून असं वाटू शकतं की हा एखाद्या प्रेमकथेवर आधारित चित्रपट आहे. त्यात तसं काही वावगंदेखील नाही. पण कथेतील नायक आणि नायिकेच्या प्रेमकथेसोबतच या चित्रपटात उलगडत जाणार आहे एक सस्पेन्स! हा सस्पेन्स कुठल्या क्राईम स्टोरीचा नसला तरी त्याच अधिरतेनं प्रेक्षकांना थिएटर्समध्ये खुर्चीला खिळवून ठेवणारं कथानक प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.चित्रपटाच्या कथा नका विषयी बोलताना सर्व कलाकारांनी आपल्या भूमिकेविषयी सांगितले.या चित्रपटाचं कथानक एका अशा वस्तूच्या भोवती फिरतं, जी व्यक्तीच्या तीन इच्छा पूर्ण करू शकते! नायकाचे काका सुपरनॅच्युरल कथांचे लेखक असून चक्क भुतांशी संवाद साधणंही त्यांना जमतं आणि त्यांच्याच मार्फत नायकच्या घरी ती वस्तू येते आणि खूप काही अनपेक्षित घडतं. पण नायक आणि नायिकेला जेव्हा समजतं की ही वस्तू तीन इच्छा पूर्ण करू शकते, तेव्हा त्यांच्यासाठी आकाश ठेंगणं होतं. पण या वस्तूसोबतच अघटित घटनांची शक्यताही येते. त्यामुळे जी काही इच्छा मागायची आहे, ती विचारपूर्वक माग, असा सल्ला नायकाला त्याच्या काकांकडून मिळतो. आता नायक आणि नायिका या वस्तूचा वापर करून नेमकं काय मागतात आणि त्यातून पुढे कशा घडामोडी घडत जातात, याचा होणारा उलगडा म्हणजे ‘प्रीत अधुरी’!कुलस्वामिनी प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती स्वप्नाली पवार यांनी केली आहे. दिग्दर्शन प्रियांका यांनी केलं आहे. प्रवीण यशवंत आणि प्रीय दुबे या नव्या जोडीची भन्नाट केमिस्ट्री चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या दोघांव्यतिरिक्त संजय खापरे, मिलिंद दास्ताने, अरुण नलावडे, शमा निनावे आणि कमलेश सावंत यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. शिव ओंकार, प्रकाशमणी तिवारी, संदीप मिश्रा आणि महादेव साळोखे यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. शिव ओंकार आणि शशिकांत पवार यांनी लिहिलेल्या गीतांना कुणाल गांजावाला, जावेद अली, साधना सरगम, शाहीद माल्या, रितू पाठक, खुशबू जैन आणि सुदेश भोसले यांच्या स्वरांचा साज लाभला आहे.चित्रपटाचं कथानक जितकं इंटरेस्टिंग आहे, तितक्याच चित्रपटाशी संबंधित इतर काही बाबीदेखील या चित्रपटाचं वेगळेपण अधिक ठळक करणाऱ्या आहेत. चित्रपटात नायकाची भूमिका करणारा प्रवीण यशवंत हा एक अव्वल दर्जाचा डबिंग आर्टिस्ट आहे. अंगी मूलत:च असलेल्या कसदार अभिनयाच्या जोरावर त्यानं अभिनय क्षेत्रात झोकात पदार्पण केलं. आजपर्यंत हिंदी, मराठी, इंग्रजी, भोजपुरी आणि उर्दू अश तब्बल ५ भाषांमध्ये आपल्या आवाजाची जादू लोकांना दाखवणारा प्रवीण आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर त्याच्या अभिनयाचं कसब जगासमोर ठेवणार आहे. एवढंच नाही तर चित्रपटाचं दिग्दर्शन हे जिल्हा परिषद शाळेत पेशाने शिक्षिका असणाऱ्या प्रियांका यांनी केलं आहे.प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुई वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, वेगळा विषय आणि त्याची अतिशय साजेशी अशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ झाल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एक संपूर्ण अनुभूती देणारा ठरेल, हे मात्र नक्की! तसेच अंधश्रद्धा व बुवाबाजीला दुजोरा देणारी कोणतीही गोष्ट या चित्रपटांमध्ये दाखवलेली नाही. कथा ही प्रेम कथेवर आधारित परंतु हॉरर व गुढ आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास यावेळी कलाकारांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!