दोन्ही भूमिका आव्हानात्मक :डॉ.अमोल कोल्हे विजयादशमीला येतोय ‘शिवप्रताप गरुडझेप’

 

कोल्हापूर: शिवप्रताप गरुडझेप या शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका या घटनेवर आधारित चित्रपट येत्या विजयादशमी रोजी प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने कोल्हापुरात डॉ.अमोल कोल्हे यांनी पत्रकारांची संवाद साधला. ते म्हणाले ‘शिवाजी महाराज त्यानंतर संभाजी महाराज आणि पुन्हा आता शिवाजी महाराज साकारताना या दोन्ही भूमिका या आव्हानात्मक होत्या. शिवाजी महाराजांच्या अतिशय बारीक सवयींचा हालचालींचा अभ्यास करून त्यावेळेला ती भूमिका साकारली. त्यानंतर संभाजी महाराजांची भूमिका समोर आल्यानंतर तेही एक मोठे आव्हानच होते, असे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रेक्षकांना या दोन्ही भूमिका भावल्या. आणि त्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. यातच मी कलाकार म्हणून भरून पावलो अशा भावना यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या.
समर्थ रामदासांनी दासबोधात एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’. शत्रूच्या बेसावधपणाचा फायदा करून घेण्यात तर छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. आग्य्राहून शिताफीने करून घेतलेली सुटका तर शिवचरित्रातील विलक्षण अध्याय होता. औरंगजेबासारख्या धूर्त आणि कुटील बादशहालादेखील बेसावध ठेवून महाराज त्याच्या हातावर तुरी देऊन कैदेतून निसटून गेले. एखाद्या कादंबरीतच शोभावी अशी ही घटना प्रत्यक्षात घडवून आणणे, हे एका अतिशय बुद्धिमान आणि सावध व्यक्तीलाच शक्य होते. शत्रू सावध नसतानाच त्याच्यावर घाला घालायचा, ही पद्धत तर महाराजांनी अनेक वेळा अतिशय यशस्वीरीत्या वापरली. हाच दैदिप्यमान इतिहास शिवप्रताप गरुडझेप चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर येतोय. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. येत्या ५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
आपल्यापेक्षा प्रबळ शत्रूला शिवाजी महाराज कधीही घाबरले नाही. ‘भय’ हा शब्द महाराजांच्या शब्दकोशात नव्हता. मुघल बादशहा औरंगजेब याने दगाबाजी करत शिवाजी महाराजांना कैद केले होते. आग्र्यातील किल्ल्यात शिवाजी महाराजांना कैदेत ठेवण्यात आले होते. तरीही शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून निसटले होते. शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाने मुघलांचे तख्त हादरले होते.
शिवचरित्रातील हाच महत्त्वाचा अध्याय उलगडून दाखवणाऱ्या या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटातील चार गाण्यांचा साज स्फुरण वाढवणारा आहे. गीतकार हृषिकेश परांजपे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार शशांक पोवार, रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीत शशांक पोवार यांचे आहे.डॉ.अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर,कार्तिक राजाराम केंढे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत. रविंन्द्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांचे आहे. संवाद डॉ.अमोल रामसिंग कोल्हे, युवराज पाटील यांनी लिहिले असून पटकथा डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांची आहे. क्रिएटिव्ह कन्सल्टंट प्रशांत खेडेकर तर क्रिएटिव्ह सुपरवायझरची जबाबदारी कीर्ती डे घटक यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शक महेश गुरुनाथ कुडाळकर आहेत. साहसदृश्ये रवी दिवाण तर वेशभूषा मानसी अत्तरदे यांची आहे. नृत्यदिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केलं आहे. रंगभूषा राहुल सुरते तर केशभूषा जयश्री नाईक यांची आहे. निर्मिती व्यवस्थापन क्रिएटिंग पिक्चर्सचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!