
कोल्हापूर : साडे तीन शक्तीपिठा पैकी एक असलेल्या आई अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात राज्यभरासह देशातून लाखो भाविक दर्शनाकरिता येतात. नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी शासन खर्चातून मोफत रिक्षा वाहतुकीची सेवा देण्यात येणार असल्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.मा.श्री.दीपक केसरकर यांनी काल जाहीर केले होते. त्यानुसार प्राथमिक स्वरूपात वर्दळीच्या पाच ठिकाणाहून परगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी सुरु करण्यात आलेल्या मोफत रिक्षा वाहतूक सेवेचा लाभ महिलांसह जेष्ठ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सौजन्याने सुरु करण्यात आलेल्या या मोफत रिक्षा वाहतूक सेवेचा उद्घाटन सोहळा श्रीफळ वाढवून आज दसरा चौक येथे पार पडला.यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्ववादी विचारांसह सेवा भावी निर्णयांचा धडाका लावला आहे. आई अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होवू नये, याकरिता नाम.मा.श्री.दीपक केसरकर यांनी घेतलेला मोफत रिक्षा सेवेचा उपक्रम उल्लेखनीय असून, कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानत आहे. या सेवेचा लाभ परगावाहून येणाऱ्या भाविकांसह स्थानिक महिला आणि जेष्ठ नागरिकांनाही होणार आहे.
Leave a Reply