
कोल्हापूर : पंचकर्माच्या मध्यवर्ती संकल्पनेसह विविध २३ पैलूतून आयुर्वेदा विषयीची सामान्य जणांची जिज्ञासा पूर्ती “सिद्धगिरी आयुष संग्रहालयातून” निश्चितपणे होईल असे शुभेच्छापर उदगार पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी “सिद्धगिरी आयुष संग्रहालयांच्या” उदघाटन प्रसंगी काढले. श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठ महासंस्थान, कणेरी येथे भारतातील पहिल्या आयुर्वेद विषयक संग्रालयाचे उदघाटन संस्थानाचे जेष्ठ सेवक सरनाईक दाम्पत्याच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी पूज्यपाद मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामीजी, संस्थानचे मुख्य अधिकारी आर. डी. शिंदे यांच्यासह विविध मान्यवर प्रमुख उपस्थित होते.आयुर्वेदातील पश्चिम महाराष्ट्रातील शास्त्रशुद्ध व परिपूर्ण उपचारासाठी सुप्रसिद्ध असलेल्या सिद्धगिरी आरोग्यधामाचे जेष्ठ वैद्य डॉ. चंद्रशेखर, डॉ. सचिन पाटील, डॉ. दत्तात्रय निकम यांच्या संशोधनपर ध्यासातून व पूज्यश्री स्वामीजींच्या प्रेरणेतून हा अभिनव प्रकल्प साकारण्यात आला आहे. या संग्रहालयातील प्रत्येक दालनामध्ये आयुर्वेदिक उपचारांच्या प्रात्यक्षिक शिल्पासहीत मराठी व इंग्रजी भाषेत माहिती दिल्याने संग्रालयास भेट देणा -या पर्यटकांस नेमकेपणाने सदर माहिती मिळण्यास मदत होईल.
वमन-विरेचन- बस्ती- नस्य आणि रक्तमोक्षण यात आयुर्वेदाच्या मध्यवर्ती पंचकर्माच्या माहितीसह तेवीस दालनासह परिपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने अभ्यग, मानसिक आजारांसाठी शिरोधारा, मानदुखीसाठी नाडी स्वेद, पाठ कणा दुखीसाठी बस्ती, कर्ण पुरन स्वेदन (स्टीम बाथ) यासह विविध उपचार पद्धतींचे दर्शन इथे पाहावयास मिळते. सामान्य जणांच्या ज्ञानात भर घालणारा व आयुर्वेद अभ्यासकांना प्रोत्साहित करणारा हा अभिनव उपक्रम ठरला आहे.
Leave a Reply