मराठी मातीशी नातं सांगणारं प्रेरणादायी गीत कैलाश खेर यांच्या आवाजात

 
हलगीचा टणकारा  दुमदुम दुमतोया, ढोलाचा घुमारा घुमघुम घुमतोया’ असे रसरशीत शब्द… कैलाश खेर यांचा  दमदार आवाज… मंगेश धाकडे यांचं रांगडं संगीत लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणं गायलं आहे. मिलिंद शिंदे यांनीच हे गीत लिहिलं असून, नुकतंच या गाण्याचा रेकॉर्डिंग करण्यात आलं. बऱ्याच काळानंतर कैलाश खेर यांनी मराठी चित्रपटासाठी गाणं गायलं असून चित्रपटाचं नाव अजून गुलदस्त्यात आहे.
अॅथलेटिक्सवर आधारित हा चित्रपट आहे. या निमित्तानं मराठीत बऱ्याच काळानं स्पोर्ट्स फिल्मची निर्मिती होत आहे. राधे मोशन्स फिल्म्स यांनी
चित्रपटाची निर्मिती केली आहे. किरण बेरड यांनी चित्रपटाचं लेखन केलं असून मिलिंद शिंदे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे तर चित्रपटाचं संगीत मंगेश धाकडे यांचं आहे.
मंगेश धाकडेनं गाणं संगीतबद्ध केल्यावर आम्ही गायकाचा शोध घेऊ लागलो. बऱ्याच गायकांच्या नावांचा विचार केल्यावर अचानक कैलाश खेर यांचं नाव समोर आलं. आम्ही त्यांना संपर्क साधला आणि गाणं पाठवलं. त्यांनी गाणं ऐकून तत्काळ गाण्यासाठी होकार दिला. रेकॉर्डिंगला येतानाही ते पूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांच्या दमदार आवाजानं हे गाणं वेगळ्याच उंचीवर पोहोचलं आहे,’ असं गीतकार आणि दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी सांगितलं.
गाण्याचे शब्दच इतके दमदार आहेत, की गाणं ऐकल्यावर ते मला गावंसंच वाटलं. हे गाणं नक्कीच ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेईल. अस्सल मराठी मातीतलं असं हे गाणं आहे,’ असं कैलाश खेर यांनी सांगितलं.
बदलत्या मराठी संगीताविषयी कैलाश खेर म्हणाले, ‘महाराष्ट्राला मोठी सांगीतिक आणि साहित्य परंपरा आहे. मराठी संगीताला पूर्वीपासूनच एक प्रकारची उंची आहे. आताच्या काळात तयार होणारं संगीतही तीच परंपरा पुढे घेऊन जात आहे. अर्थपूर्ण, ह्रदयाला भिडणारे शब्द आणि संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या संगीतानं मराठी संगीत अधिक लोकप्रिय होऊ लागलं आहे. ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!