
कोल्हापूर: सर्व समाजघटकांना शिक्षणाची समान संधी व समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने उद्यापासून शिवाजी विद्यापीठात सुरू होणाऱ्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेत सकारात्मक व सर्वंकष विचारविमर्श करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय विश्वविद्यालय संघाचे (ए.आय.यू.) सरचिटणीस प्रा. फुरकान कमर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विश्वविद्यालय संघ (ए.आय.यू.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेस उद्यापासून (दि. २६ नोव्हेंबर) येथे प्रारंभ होत आहे. या परिषदेसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती संबोधित करताना प्रा. कमर बोलत होते.
ज्ञानाच्या सृजनात्मकतेमध्ये आघाडीवर असणाऱ्या देशाचे भवितव्यच भविष्यात उज्ज्वल आहे. उच्चशिक्षण संस्थांच्या संख्यात्मक पातळीवर भारतात जगातील सर्वाधिक शिक्षण संस्था आहेत. अमेरिका व युरोपमध्ये जिथे केवळ पाच-पाच हजार विद्यापीठे आहेत, तिथे भारतात ८०० विद्यापीठे आणि ४० हजारहून अधिक महाविद्यालये आहेत. भारतातील विद्यार्थी संख्या तीन कोटींच्या घरात आहे. चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही २२ ते २३ टक्क्यांच्या घरात आहे. हा आकडा किमान ३० ते ३५ टक्क्यांच्या घरात नेण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्याचबरोबर रोजगार संधीच्या बाबतीतही मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यामध्येही मोठी तफावत आहे. ही आव्हाने पेलण्यासाठी उच्चशिक्षणाच्या पातळीवर धोरणात्मक दिशादर्शन करण्याचा प्रयत्न ए.आय.यू. करीत आहे. ए.आय.यू.तर्फे विभागीय तसेच मध्यवर्ती स्तरावर देशाच्या शैक्षणिक धोरणांसंदर्भात तसेच शिक्षणाच्या क्षेत्रातील नवनवीन आधुनिक प्रवाहांचा वेध घेऊन त्यांचा भारतीय शिक्षण पद्धतीत समावेश करण्याच्या अनुषंगाने कुलगुरू परिषदांचे आयोजन करण्यात येते. या परिषदांमधील विचारमंथनातून निघणाऱ्या निष्कर्षांचा सविस्तर अहवाल तयार केला जातो. तो केंद्र सरकारला सादर करण्यात येतो.
पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचा मध्यवर्ती विषय ‘डिजिटल इंडिया ॲन्ड हायर एज्युकेशन’ असा असून केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’ या धोरणांचा उच्च शिक्षणात समावेश आणि या धोरणांना पूरक उच्च शिक्षण पद्धतीचा विकास या अनुषंगाने विचारविमर्श करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या या परिषदेस राजस्थान, गुजरात, गोवा व महाराष्ट्रातील विद्यापीठांचे साधारण तीस कुलगुरू उपस्थित राहणार आहेत. देशाच्या विविध भागांतील कुलगुरूंनी शिवाजी विद्यापीठास भेट द्यावी आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या शैक्षणिक, संशोधकीय कार्याची त्यांना माहिती व्हावी, हा या परिषदेचे यजमानपद स्वीकारण्यामागील प्रमुख हेतू आहे. या परिषदेचे उद्घाटन आज सकाळी ९.३० वाजता बिट्स पिलानीचे माजी संचालक व के.के. बिर्ला गोवा कॅम्पसचे प्राध्यापक जी. रघुरामा यांच्या हस्ते करण्यात येईल. ए.आय.यू.चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर अध्यक्षस्थानी तर बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा प्रमुख उपस्थित असतील.
या दोन दिवसीय परिषदेत पहिल्या सत्रात ‘मेक इन इंडिया फॉर डिजिटल पॅराडाइम’ या चर्चासत्रात डॉ. एच. महेशप्पा ‘सेक्टर स्कील्स इनिशिएटीव्ह्ज अंडर डिजिटल इंडिया’ या चर्चासत्रात मुंबईच्या ‘नॅसकॉम’चे युधिष्ठिर यादव मार्गदर्शन करतील. ‘डिजिटल इंडिया ॲन्ड हायर एज्युकेशन: रोल ऑफ कॉर्पोरेट सेक्टर’ या चर्चासत्रात मायक्रोसॉफ्ट इंडियाचे संचालक सुनील पी.पी. मार्गदर्शन करतील. २७ नोव्हेंबरला चौथ्या चर्चासत्रात ‘आयसीटी बेस्ड फ्युचरिस्टीक टेक्नॉलॉजी ॲन्ड पोटॅन्शियल रोल ऑफ इंडिया इन हॉरिझॉन २०२०’ या विषयावर पुण्याच्या ‘सी-डॅक’चे संचालक व ‘डब्ल्यू-थ्री-सी भारत’ प्रकल्पाचे कंट्री मॅनेजर महेश कुलकर्णी मार्गदर्शन करतील. ए.आय.यू.च्या बिझनेस सेशनने परिषदेचा समारोप होणार आहे.
यावेळी ए.आय.यू.च्या सहसचिव डॉ. वीणा भल्ला व ‘युनिव्हर्सिटी न्यूज’च्या संपादक डॉ. रमा देवी पाणी यांनी ए.आय.यू.च्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी ए.आय.यू.चे सहसचिव सॅम्पसन डेव्हीड, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. आर.के. कामत, डॉ. निशा मुडे-पवार उपस्थित होते.
Leave a Reply