
उच्चशिक्षणात’डिजिटल इंडिया’ला यशस्वी करण्याची क्षमता:प्रा.जी.रघुरामा
कोल्हापूर : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला यशस्वी करण्याची सर्वाधिक क्षमता उच्चशिक्षण क्षेत्रातच आहे, असे प्रतिपादन ‘बिट्स पिलानी’चे माजी संचालक व गोव्याच्या के.के. बिर्ला कॅम्पसचे प्रा. जी. रघुरामा यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ व भारतीय विश्वविद्यालय संघ (ए.आय.यू.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचे आज उद्घाटन झाले. परिषदेचे उद्घाटक या नात्याने ‘डिजिटल इंडिया व उच्चशिक्षण’ या विषयावर ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ए.आय.यू.चे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर होते. बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा प्रमुख उपस्थित होते.
डिजिटल इंडिया अभियानाच्या यशस्वितेमध्ये आर्थिक व पायाभूत तांत्रिक बाबींचा अडथळा असला तरी भारताच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून त्याकडे अत्यंत सकारात्मकपणे पाहण्याची गरज असल्याचे सांगून प्रा. रघुरामा म्हणाले, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण क्रांती यांमुळे सुविधांचा होणारा गतिमान विकास या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षण क्षेत्रात अनेकानेक उपयुक्त व्यासपीठे निर्माण होत आहेत. सर्व शिक्ष विद्यापीठे डिजिटल इंडिया अभियानामध्ये व्यापक सहभाग नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे त्याचे लाभही घेऊ शकतात. डिजिटल इंडिया अभियानातील डिजिटल लॉकर सुविधेचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे ऑनलाइन प्रमाणपत्रे, पदवी कशा प्रकारे प्रदान करता येऊ शकतील, याचा विचार करता येईल. ऑनलाइन परीक्षा, असेसमेंट, प्रवेश प्रक्रिया, सुपर फॅकल्टी किंवा मॅसिव्ह ऑनलाइन अभ्यासक्रम त्याचप्रमाणे नवनिर्मिती व उद्योजकता प्रशिक्षण व कौशल्य विकास आदींबाबतही या अभियानाचा चांगला वापर करवून घेता येऊ शकतो. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी समाजमाध्यमांचा उपयुक्त वापर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अद्ययावत अभ्यासक्रम निर्मिती यांच्यासाठीही ऑनलाइन व्यासपीठांचा प्रभावी वापर करता येईल. ऑनलाइन माध्यमांमुळे आता विद्यापीठांनी अधिक स्वतंत्र, स्वायत्त व गतिमान होण्याची वेळ आली आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सर्वांनी केवळ ‘प्रो-भारत’ किंवा ‘प्रो-इंडिया’ विचारसरणी अवलंबण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. फुरकान कमर म्हणाले की, उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात डिजिटल इंडिया अभियानाच्या माध्यमातून देशाचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. सातत्याने होणारे बदल स्वीकारणे, त्यांना सामोरे जाणे आणि विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्याची प्रमुख जबाबदारी विद्यापीठांवर आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी जगाला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात उलट चित्र दिसते. हे चित्र नव तंत्रज्ञानाच्या आधारावर बदलण्याची गरज आहे. त्यासाठी देशातील जास्तीत जास्त तरुणांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सद्यस्थितीत विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये प्रचंड लवचिकता आणण्याची गरज आहे. स्वतःच्या वेळेनुसार व गरजेनुसार ऑनलाइन स्वरुपात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना शिक्षकांवर त्यांचे शंका निरसन करण्यासाठी तयार राहण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे शिक्षकांनीही नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्यावरील अतिरिक्त भार कमी करून नव अध्यापन तंत्रांचा अंगिकार केला पाहिजे. संशोधन व नवनिर्मितीच्या नवसंकल्पनांना आविष्कृत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते वटवृक्षाला पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. परिषदेच्या निमित्ताने ए.आय.यू.चे साप्ताहिक ‘युनिव्हर्सिटी न्यूज’च्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी आभार मानले. यावेळी शहीद दिनानिमित्त शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले तर संविधान दिनानिमित्त प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
यावेळी परिषदेसाठी उपस्थित राहिलेल्या चार राज्यांतील कुलगुरू व त्यांच्या प्रतिनिधींसह ए.आय.यू.चे सहसचिव सॅम्पसन डेव्हीड, सहसचिव वीणा भल्ला, ‘युनिव्हर्सिटी न्यूज’च्या संपादक डॉ. रमा देवी पाणी, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभाग प्रमुख पी.टी. गायकवाड यांच्यासह विविध अधिविभागप्रमुख, प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply