
कोल्हापूर/ प्रतिनिधी डॉ. डी .वाय .पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर आणि कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे यांच्या संयुक्त सहकार्याने २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत तपोवन, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाचा आज समारोप करण्यात आला.
या कृषी प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रदर्शन पाहण्यासाठी कोल्हापूरसह इचलकरंजी, सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटक येथील शेतकऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रदर्शनात झालेल्या मार्गदर्शनपर संवादाने शेतकरी प्रभावित झाले होते. प्रदर्शनातून सुमारे 10 कोटींहून अधिक उलाढाल झाली. यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहकांना देखील लाभ झाला.
नवनवीन तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचावे या हेतूने हे कृषिप्रदर्शन आयोजित केले आहे. हा उद्देश सफल होताना दिसत आहे. या कृषी प्रदर्शनास सहकार्य करणारे स्टॉलधारक, शेतकरी, कृषी अधिकारी, आयोजक विनोद पाटील, धीरज पाटील,स्वप्नील सावंत यांचे विशेष कौतुक आहे.
याप्रसंगी बोलताना बिव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांनी प्रत्येक शेतकऱ्याने माती आणि पाणी परीक्षण करणे गरजेचे आहे असे सांगितले. परीक्षणानुसार खत व्यवस्थापन केल्यास अधिक उत्पादन घेणे शक्य होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
खासदार संजय मंडलिक यांनी सतेज कृषी प्रदर्शन सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपलेसे वाटत आहे. समारोपाच्या दिवशी देखील इथं उपस्थित असणारी गर्दी हेच दर्शवते असे आपल्या मनोगतात सांगितले.
प्रदर्शनाच्या निमित्ताने पीक स्पर्धा, पुष्पस्पर्धा, गटनिहाय जनावरे स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. सर्व पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अंकोली (ता.मोहोळ, जिल्हा सोलापूर) येथील भारत मारुती भालेवार यांच्या खोंडाला चॅम्पियन ऑफ द शो पुरस्काराने तर दर्डेवाडी (ता.आजरा, जिल्हा कोल्हापूर) यांच्या खोंडाला प्रेक्षकांचे खास आकर्षण पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास खासदार संजय मंडलिक, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ए. वाय. पाटील, बिव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पेठवडगावचे मोहनलाल माळी, संदीप नरके, बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई, राहुल खंजिरे, आय.एस.टी. दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांच्यासह मान्यवर, शेतकरी उपस्थित होते.
Leave a Reply