शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरे :राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दि.२३ जानेवारी २०२३ रोजी जयंतीनिमित्त सामाजिक कार्याचा वसा जपला जातो. शिवसेनाप्रमुखांच्या ९७ व्या जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. या महाआरोग्य शिबिरांच्या नियोजनाकरिता महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या अधिकारी आणि योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक आज शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, येथे पार पडली.यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ रुग्णालयातील काही रुग्णालयांबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी येत असतात. सदर रुग्णालयाचे नागरिकांशी असणारे वर्तन आणि उपचार पद्धती तात्काळ सुधारण्याच्या सूचना जिल्हा समन्वयक यांनी द्याव्यात. शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी जनआरोग्य योजना समन्वयक आणि मदत कक्ष प्रमुखांनी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.ते पुढे म्हणाले कि, शिवसेनेच्या वतीने सातत्याने नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. शिवसेनाप्रमुखांची जयंती ही दरवर्षी सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात येते. यंदाही दि.२३ जानेवारी रोजी शहरात १२ ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे प्रयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ रुग्णालयांना सहभागी करण्यात यावे. या रुग्णालयांचे विविध आजारांवरून वर्गीकरण करून प्रत्येक ठिकाणी ४ ते ५ रुग्णालयांच्या वैद्यकीय पथकास विविध आजारांशी निगडीत तपासणी, औषधोपचाराचे नियोजन करण्यात यावे. त्यापद्धतीने स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि शिबीर समन्वयक यांच्याशी संपर्क साधून ही महाआरोग्य शिबिरे यशस्वी करावीत, अशा सूचना दिल्या.यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, जनआरोग्य योजना जिल्हा समन्वयक रोहित खोलखंबे, जिल्हा समन्वयक रेणुका वडुलेकर, वैद्यकीय अधिकारी चेतन खाडे, सुपरवायझर तेजस पायमल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख कृष्णा लोंढे यांच्यासह योजनेत समाविष्ट असणाऱ्या रुग्णालयांचे प्रतिनिधी, शिबीर समन्वयक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!