
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) संघाचे शिल्पकार व माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गोकुळ मिल्क ई सुविधा या मोबाईल ॲपचा शुभारंभ सोहळा पार पडला. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय परिसरातील स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्यास आमदार सतेज पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात गोकुळ मिल्क सुविधा मोबाईल ॲपचा शुभारंभ करण्यात आला.आमदार सतेज पाटील म्हणाले, ” स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांनी शेतकरी हा धर्म म्हणून आयुष्यभर काम केले. सामान्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी गोकुळच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आखल्या. पक्ष आणि गटातटाच्या पलीकडे जाऊन शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून त्यांनी आयुष्य खर्ची घातले. ” स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून साकारलेल्या गोकुळ दूध संघाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद फुलविला. सामान्य शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी व्यवस्था निर्माण झाली. सर्वसामान्य शेतकरी दूध उत्पादक महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे व गोकुळच्या विकासाचे जे स्वप्न आनंदराव पाटील चुयेकर यांनी पाहिले ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. त्यांच्या विचार कार्याचा वारसा सांगताना गोकुळचा विस्तार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विकास या दोन्ही गोष्टी साकार करणे ही गोकुळशी निगडीत प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. गोकुळने वीस लाख लिटर दूध संकलनाचे ध्येय समोर ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी गोकुळचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी सुपरवायझर, पुरवठादार या साऱ्यांनी एकसंधपणे काम केल्यास लवकरच ते साध्य होईल. आज शुभारंभ केलेल्या ‘गोकुळ मिल्क ई सुविधा’ॲपच्या माध्यमातून ॲपच्या गोकुळ सलग्न प्राथमिक दूध संस्थानासेवा सुविधा पोहोचवण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे” असे गौरवोद्गार गोकुळचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी काढले.
गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, “स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांनी लावलेल्या गोकुळ रुपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. गोकुळने नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. गोकुळमार्फत वेगवेगळ्या सुविधांची अंमलबजावणी केली. या विकासाभिमुख योजनांचा भाग म्हणून गोकुळमार्फत सुरू असलेल्या सेवा सुविधा प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी गोकुळ मिल्क ई सुविधा मोबाईल ॲप मराठीतून तयार केले आहे. या मोबाईल ॲप द्वारे संस्थामार्फत संघास होणा-या दैनंदिन दूध पुरवठ्याची माहिती ,प्रत्येक १० दिवसाच्या दूध बिलासंबधीत माहिती ,संस्थांची पशुखाद्य मागणी ,पशुवैद्यकीय सेवेसाठीची स्पेशल व्हीजीट मागणी,संस्था तक्रार निवारण या सुविधा देणेत येणार आहेत. यापैकी पहिल्या टप्यात आजपासूनच संस्थाना दैनंदिन दूध पुरवठ्याची माहिती व १०दिवसाच्या दूध बिलासंबधीत माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. नजीकच्या काळात अॅपमध्ये उर्वरित घटकांचा समावेश टप्याटप्याने केला जाईल असे मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे स्वागत संचालक अजित नरके यांनी केले. एम. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपस्थित संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी आभार मानले.याप्रसंगी आमदार सतेज पाटील ,आमदार राजेश पाटील, चेअरमन विश्वास पाटील, जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले,रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, ,संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील व स्व.चुयेकर साहेबांचे कुटुंबीय,दूध संस्था प्रतिनिधी,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply