
कोल्हापूर :आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार, दुर्ग अभ्यासक आणि शिक्षक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पहिले जनसंपर्क अधिकारी सु. रा. देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार यंदा अक्षर दालनचे रविंद्र जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. ख्यातनाम कवी अशोक नायगावकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार दि. ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता राम गणेश गडकरी सभागृहात या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती डाॅ. सागर देशपांडे यांनी पत्रकातून दिली. ११ हजार रूपये रोख आणि मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिक्षण, इतिहास, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कामगिरी केलेल्या सु. रा. देशपांडे यांच्या सहाव्या स्मृतीदिनी हा कार्यक्रम होणार असून जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
गेली ४५ वर्षे जोशी हे ग्रंथवितरण क्षेत्रात कार्यरत असून हे करताना त्यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध साहत्यिक, सांस्कृतिक आणि वाचन संस्कृती वृध्दींगत करणाऱ्या कार्यक्रमांसाठी पाठबळ दिले आहे. विविध साहित्य संमेलनांच्या नियोजनामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्यापासून ते गेली १२ वर्षे कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या अक्षरगप्पांच्या प्रारंभापर्यंतच्या उपक्रमांमध्ये जोशी यांचा नेहमी सक्रीय सहभाग राहिला आहे. विविध सामाजिक,साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थाचे अक्षर दालन हे हक्काचे ठिकाण असून त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना सु. रा. देशपांडे स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याआधी डाॅ. सुनीलकुमार लवटे, अरविंद इनामदार आणि माजी खसदार प्रदीप रावत यांच्या हस्ते अनुक्रमे अनंतराव आजगावकर, किरण ठाकुर, प्रा. नवनाथ शिंदे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी अगत्याने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Leave a Reply