
कोल्हापूर: महाडिकांच्या गलथान कारभारामुळे शिरोलीतील सभासदांना आपला ऊस पेटवून कारखान्याला घालण्याची वेळ आली आहे. पाच हजार रुपये दिल्याशिवाय तोडणी मिळत नाही. महाडिक स्वतःला शिरोलीचे म्हणतात, मग शिरोलीत राजाराम कारखान्याचे नवीन सभासद का केले नाहीत असा सवाल शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे यांनी केला. शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथे परिवर्तन आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. सतेज पाटील उपस्थित होते.
शशिकांत खवरे पुढे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही गावातील पाणंद रस्ते केले आहेत. मात्र, गेल्या २८ वर्षात पाणंद रस्ते करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पाणंद रस्त्याचे फलक लावले आहेत. हि दिशाभूल सभासदांच्या लक्षात आली असून ते नक्कीच परिवर्तन घडवतील.
आ. सतेज पाटील म्हणाले, शिरोलीकरांना ऊस तोडीसाठी महाडीकांचे उंबरठे झिजवावे लागणे हे दुर्दैवी असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या महाडीकांना आता धडा शिकवा.
ही आरपारची लढाई असून यात परिवर्तन आघाडीचा विजय निश्चित असल्याचे आ. राजूबाबा आवळे यांनी सांगितले.
माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण म्हणाले, गोकुळ असो कि राजाराम कारखाना महाडीक स्वत:च्या घरातील उमेदवार देतात. आ. सतेज पाटील यांनी मात्र प्रत्येक निवडणुकीत सर्वसामान्य सभासदांना उमेदवारी दिली आहे. शिरोलीत आ. सतेज पाटील यांचा डिजिटल फलक लागला तरी महाडीक घाबरून जातात.
राजाराम कारखाना हाकेच्या अंतरावर असूनही शिरोलीतील सभासदांच्या उसाला पाच –सहा महिने उशिरा तोड दिली जाते. या निवडणुकीत याचा हिशोब शिरोलीकर सभासद चुकता करतील असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे यानी दिला.
कारखान्याचे माजी संचालक बी. टी. देशमुख म्हणाले, शिरोलीत राजाराम कारखान्याचे 900 सभासद असून त्यापैकी 300 सभासद हे येलुरचे आहेत. बोगस सभासद करणाऱ्या महाडीकांना शिरोलीतील स्थानिक सभासद ताकद दाखवतील.
पं स. सदस्य उत्तम सावंत, बाजीराव सातपुते यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजी पोवार, राजकुमार पाटील, बाजीराव जाधव, दीपक खवरे, राहुल खवरे, उत्तम पाटील, बाजीराव सातपुते, पृथ्वीराज पाटील, भगवान पाटील, शक्ती यादव, ज्योतीराम पोर्लेकर, राजू सुतार, अल्लाउद्दीन मुल्ला, सरदार मुल्ला, मोहसीन देसाई, मेहुद्दीन मुल्ला, जमीन मुल्ला, जुबेर मुल्ला, अमीर मुल्ला, हरून मोमीन, शकील फकीर गोलंदाज मुन्ना सनदे यांच्यासह यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply