कृती समितीच्या विरोधात आंदोलन करण्याचा सफाई कामगारांचा इशारा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी: सीपीआर मधील सफाई कर्मचारी आणि डी.एम कंपनीचे चांगले संबध आहेत. कंपनीकडून आम्हाला सहकार्य मिळत असते.चांगला पगार दिला जातो. मात्र आता या कंपनीला ठेका मिळू नये यासाठी एका माजी ठेकेदाराने कोल्हापूर शहर सर्वपक्षीय असंघटित कामगार अन्याय निवारण समितीच्या आडून डीएम कंपनीच्या बदनामीचे षडयंत्र सुरू केले आहे. याला काही कर्मचारी खतपाणी घालत आहेत. इतर सफाई कर्मचाऱ्यांनाही त्रास दिला जात आहे. वेठिस धरले जात आहे. हा त्रास व डी.एम कंपनीची बदनामी सफाई कर्मचारी कदापि सहन करणार , हा प्रकार थांबला नाही तर कृती समितीच्या विरोधात आम्हीच आंदोलन उभे करून कृती समितीतील प्रमुखांच्या घरासमोर मुलाबाळांसह ठिय्या मारू असा इशारा सीपीआर मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिला आहे.यासंदर्भात कर्मचाऱ्यांची बैठक सीपीआर मध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये डीएम कंपनीच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी कामगार प्रतिनिधी मनिषा चव्हाण, अरुण कांबळे , अनिल माने यांनी यापूढील काळात बिनबुडाचे आरोप करणार्‍यांवर प्रसंगी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.सीपीआर मध्ये २०१७ पासून डी. एम कंपनी आपल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मात्र यावर्षी आता ठेका देण्याचा मुद्दा पुढे आला असल्याने या डी.एम कंपनीच्या विरोधात बदनामीचे षडयंत्र रचले जात असून यात कृृती समितीने डी.एम कंपनीच्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांना अमिष दाखवून आपल्याकडे ओढून घेतले आहे. त्यांना खोटी स्वप्ने दाखवून कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यास भाग पाडले आहे.सी.पीआर मध्ये डीएम कंपनीच्या माध्यमातून सफाई कर्मचारी चांगल्या पद्धतीने आपली सेवा देत आहेत. चांगल्या पद्धतीने डी.एम कंपनीकडून काम चालू आहे. मात्र काहींना कोणत्याही परिस्थितीत डी.एम कंपनीला ठेका मिळू द्यायचा नाही यासाठी श्रमिक संघटनेसह कोल्हापूर शहर सर्वपक्षीय असंघटित कामगार अन्याय निवारण समितीने डीएम कंपनीतील कर्मकऱ्यांना वेठीस धरणे व वारंवार त्रास हा दिला जात आहे. मात्र याला कर्मचारी बळी पडत नसल्यानेच श्रमिक समितीने ही बदनामी चालू केली आहे. परंतु सफाई कर्मचारी कंपनीच्या विरोधात जाणार नाहीत असा निर्धार यावेळी या कर्मचाऱ्यांनी बैठकीत बोलून दाखविला आहे.सीपीआर मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नाव पुढे करून डीएम कंपनीला टार्गेट करणाऱ्या कृती समितीला यापुढे जाब विचारण्याचा निर्धार स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केला आहे. येत्या ६ एप्रिल रोजी कृती समितीची बैठक आहे. या बैठकीवेळी आम्ही सर्व स्वच्छता कर्मचारी या कृती समितीच्या प्रमुखांना घेराव घालून जाब विचारणार आहोत असे अनिल माने यांनी या बैठकीमध्ये सांगितले आहे.शिवाय कृती समितीतील सर्व सदस्यांच्या घरासमोर आम्ही कुटुंबासह आंदोलन करणार आहोत असाही इशारा देण्यात आला आहे. डीएम कंपनीच्या माध्यमातून सीपीआरमध्ये सर्व कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांना वेठीस धरण्याचे काम कृती समितीकडून चालू असून या विरोधात आता कर्मचारी आंदोलन करणार आहेत असा इशारा आहे.यावेळी महिला कर्मचाऱ्यांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी बैठकीला मनीषा चव्हाण,अरुण कांबळे, शंकर कांबळे, लता माळगे, पद्मा मुधाळे, रोहिणी कांबळे, नग्मा मकानदार, मनिषा पोवार, वत्सला शिंदे, उमा मेस्त्री, सविता पोवार दिगंबर पाटील सुजित सांवत आदी सह महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!