खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

 

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि पक्षाच्या संघटन वाढीसाठी तसेच राज्यसभेचे सदस्य म्हणून सर्वोत्तम योगदान देण्याचे अभिवचन दिले. यावेळी खासदार महाडिक यांच्या पत्नी सौ. अरुंधती महाडिक, पृथ्वीराज, विश्वराज, कृष्णराज तसेच स्नुषा सौ. वैष्णवी आणि नातू चिरंजीव अमरेंद्र असे संपूर्ण महाडिक कुटुंबीय उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या परिवारातील सदस्यांची सुद्धा आत्मीयतेने आणि आपुलकीने चौकशी करून संवाद साधला. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन दिले. ज्यामध्ये कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांबाबत लक्ष वेधले. कोल्हापूर शहरातून रत्नागिरीला जाणारा महामार्ग जातो. त्यामुळे कोल्हापूर शहरात सुमारे सात किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारावा, तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कोल्हापूर शहराबाहेरून सुमारे ६५ किलोमीटर लांबीचा नवा रिंग रोड तयार करावा, या दोन्ही कामांची जबाबदारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे द्यावी, अशी विनंती खासदार महाडिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली. तसेच सातारा, पंढरपूर, करुळ, कामटी हा सोलापूर जिल्ह्यातील रस्ता, पर्यटक आणि भाविक यांच्यासाठी महत्वाचा आहे. महाबळेश्वर, पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट येथे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. शिवाय १५ साखर कारखान्यांच्या वाहनांची याच रस्त्यावरून वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करावा, आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. या दोन्ही मागण्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मकता दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!