
कोल्हापूर:राजाराम कारखान्याच्या सभासदांच्या मनात सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष असून तो या निवडणुकीत मतदानातून दिसून येईल. ही निवडणूक म्हणजे सभासदांचा उठाव असून ही परिवर्तनाची लाट आहे, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने पोर्ले तर्फ ठाणे, पिंपळे तर्फ ठाणे, आळवे, कोतोली गावातील सभासद संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार ऋतुराज पाटील पुढे म्हणाले, राजाराम कारखान्यातील सभासदांना न्याय देण्यासाठी ही लढाई आहे. प्रचाराच्या निमित्ताने विविध सभासदांशी बोलताना सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधात सभासदांमधून चीड व्यक्त होत आहे. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा असून तो सहकारीच रहावा यासाठीचा हा लढा आहे. सभासदांनीच आता कारखान्यात परिवर्तन घडवण्याचा निर्धार केला आहे.
यावेळी अनेक सभासदांनी सत्ताधाऱ्यांकडून कसा त्रास दिला जातो याची कैफियत मांडली. हिराबाई पाटील या आजीने कारखान्याकडून वेळेत ऊस नेला जात नाही, अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास दाद घेतली जात नाही, अशी खंत व्यक्त केली.
सभासद राजकुमार चौगुले म्हणाले, मागील 28 वर्षात सत्ताधाऱ्यांकडून सभासदांचा फक्त अपेक्षा भंग झाला आहे. सभासदांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेतले जात नाही. यावेळी नक्कीच परिवर्तन होणार असून कारखाना सर्वसामान्य सभासदांचा रहावा हे स्वप्न यावेळी साकार होईल.
यावेळी प्रकाश पाटील, डी. जी. पाटील, बळवंत पाटील, सज्जन पाटील, माजी सरपंच वैभव पाटील, विक्रम पाटील, विष्णू पाटील, सरदार गायकवाड, अण्णासाहेब गायकवाड, राजकुमार चौगले, पी. एम. पाटील, सचिन चौगले, हर्षवर्धन चौगले, दिनकर चौगले, रवींद्र पाटील, रामचंद्र यादव यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोतोली- येथील सभासद संवाद कार्यक्रमात बोलताना आमदार ऋतुराज पाटील. सोबत मान्यवर.
Leave a Reply