डी.वाय.पाटील कारखान्याची बदनामी गगनबावड्यातील जनता सहन करणार नाही : मानसिंग पाटील

 

असळज: गगनबावडा तालुक्याच्या विकासात डॉ. डी. वाय. पाटील घराण्याचे मोठे योगदान आहे. तालुक्यासाठी व कारखान्यासाठी डी. वाय. दादांनी दिलेले योगदान व त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीच सर्व सभासदांनी कारखान्याला त्यांचे नाव दिले. त्यामुळे डी. वाय. पाटील कारखान्याची बदनामी गगनबावडातील जनता सहन करणार नाही असा इशारा कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील यांनी दिला आहे. राजर्षी छ. शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने असळज येथे झालेल्या गगनबावडा तालुक्यातील सभासदांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानसिंग पाटील म्हणाले, अत्यंत कठीण परिस्थीतीत, अतिशय दुर्गम भागात, प्रचंड मेहनतीने डी. वाय. पाटील साखर कारखाना उभारला आहे. या कारखान्याने अल्पावधीतच को-जनरेशन व डिस्टीलरी प्रकल्पही सुरु केले. जास्त पावसाच्या या भागात कमी रिकव्हरीचा ऊस गाळप करुन राजाराम कारखान्यापेक्षा किमान 150 रुपये जादा दर आम्ही शेतकऱ्याना दिला आहे. आमदार सतेज पाटील यांनी अतिशय नियोजनबद्धरित्या हा कारखाना चालवत आहेत. गगनबावडा तालुक्यातील शेतकऱ्याच्या जीवनात या कारखान्यामुळे आर्थिक सुबत्ता आली आहे. त्यामुळे डी. वाय. पाटील कारखान्याची बदनामी येथील जनता सहन करणार नाही. 2014 व 2019 च्या निवडणुकीत गगनबावडा तालुक्याची ताकद महाडीकानी अनुभवली आहे. या निवडणुकीतही तालुक्याची ताकद दाखवून देऊ.

गोकुळचे संचालक बयाजी शेळके म्हणाले, राजाराम कारखान्याच्या सभासदांची दिशाभूल करण्याचे काम महाडिक कंपनी सातत्याने करत आहे. अमल महाडिक यांनी गगनबावड्यातील साखरी गावातील आपली जमीन 2 लाख रुपये घेऊन त्याआधारे 10 वर्षासाठी घानवट दिली आहे. चावरे गावातील 58 लोकांना बोगस सभासद करुन महाडीकांनी लबाडी केली. या लबाड टोळीला मुळासकट उखडून टाकून त्याना येलूरचा रस्ता दाखवा.

आमदार सतेज पाटील म्हणाले, जन्मभूमी कसबा बावडाबरोबरच कर्मभूमी गगनबावडाही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. गेल्या 25 वर्षाच्या माझ्या यशात कसबा बावडाबरोबरच गगनबावड्याचाही सिंहाचा वाटा आहे. मागील निवडणुकीप्रमाणेच राजाराम कारखान्याच्या निवडणूकीत तालुक्याची ताकद दाखवून परिवर्तन पॅनेला विजयी करा.

माजी अध्यक्ष सर्जेराव माने म्हणाले, निवडणूक समोर आहे म्हटल्यावर नेहमीप्रमाणे महाडीक आश्वासनांचा पाउस पाडत आहेत.
यावेळी डी. वाय. पाटील कारखान्याचे संचालक सहदेव कांबळे, बजरंग पाटील, दिगंबर मेडसिंगे, नंदकुमार चौगले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संभाजी पाटणकर, कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, संचालक चंद्रकांत खानविलकर, संजय पडवळ, महादेव पडवळ, उदय देसाई, जयसिंग ठाणेकर, अभय बोभाटे, पांडुरंग पडवळ, रामा जाधव, रामचंद्र पाटील, विलास पाटील, प्रकाश देसाई, संभाजी कुंभार, निवास पाटील, सचिन चव्हाण, सुनिल मोदी, उमेदवार दगडू चौगले, पुतळाबाई मगदूम, सचिन नरसगोंडा पाटील, प्रकाश मेंगाणे यांच्यासह तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!