कर्जरत्नांनी आम्हाला सहकाराची भाषा शिकवू नये :आमदार सतेज पाटील

 

कांडगाव : भीमा साखर कारखान्यावर 598 कोटीं कर्जाचा डोंगर उभा करून तेथील सभासदांना देशोधडीला लावणाऱ्या कर्जरत्नांनी आम्हाला सहकाराची भाषा शिकवू नये. सहकारी संस्था मोडीत काढून खाणाऱ्या महाडिक पॅटर्नला कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करा. बुडवेगीरीचा इतिहास असलेले हे कर्जरत्न राजाराम कारखान्यावर असलेले 125 कोटीचे कर्ज आणखी वाढवून कारखान्याचे वाटोळे करतील. त्यामुळे यावेळी कंडका पाडण्याचा निर्धार सुज्ञ सभासदांनी केला असल्याचे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. शाहू परिवर्तन आघाडीच्या कांडगाव येथील प्रचार सभेत बोलत होते.

आमदार सतेज पाटील पुढे म्हणाले, एकीकडे भीमा कारखान्यावर कर्जाचा डोंगर करणा-या बुडव्या खासदाराना राज्यमंत्रीमंडळाने 148 कोटींच्या कर्जाला दुस-यांदा थकहमी नाकारली आहे. त्यांनी हे कर्ज बुडविण्यासाठीच घेतले असल्याचे मंत्रीमंडळाने म्हटले आहे. त्यामुळे फसवाफसवी, बुडवाबुडवीचा इतिहास असणा-या कर्जरत्नांना राजारामपासून दुरच ठेवा, असे त्यांनी सांगीतले.

गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, महाडिकांच्या कारभाराला सभासद कंटाळले असून कारखान्यात परिवर्तन निश्चित होणार आहे. महाडिकानी राजाराममध्ये जिल्ह्याबाहेरील सभासद वाढवले. आम्ही मात्र गोकुळ मध्ये जिल्ह्यातील दूध संस्थांना सभासदत्व दिले आहे.
यावेळी भारती पोवार, सखाराम चव्हाण, महेश चव्हाण, महेश मगदूम, रघुनाथ चव्हाण, निवास घोसरवाडे,आनंदा मगदूम यांनी मनोगत व्यक्त केली. सभेला गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, बाबासाहेब चौगले, अंजना रेडकर, जोतिराम पोर्लेकर, मधुकर रामाने, शिवाजी पाटिल, चंद्रकांत चौगले, विलास पाटील, सुयोग वाडकर, स्मिता गवळी, जयश्री मेडसिंगे, एकनाथ पाटील, एल एस पाटील, रोहित मिरजे यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!