रिकव्हरी कमी दाखवून महाडीकांनी 300 कोटींचा ढपला पाडला : सर्जेराव माने

 

भेंडवडे : उस उत्पादक सभासद हाडाची काडं करून राजाराम कारखान्याला साडेबारा ते तेरा रिकव्हरीचा उस घालतात. मात्र महाडिकांनी दीडने रिकव्हरी कमी दाखवून गेल्या 28 वर्षात 300 कोटीचा ढपला पाडला असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केला. शाहू परिवर्तन आघाडीच्या कुंभोज, भेंडवडेतील सभासद संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्जेराव माने पुढे म्हणाले, राजाराम कारखाना दरवर्षी सुमारे चार लाख टन उसाचे गाळप करतो. सभासद कारखान्याला चांगल्या रिकव्हरीचा ऊस घालतात. मात्र राजाराम कारखान्यात महाडिकांकडून रिकव्हरी 11.72 दाखवली जाते. म्हणजेच दरवर्षी 40 लाख किलो साखर उत्पादन कमी दाखवले जाते. या साखरेचा दर प्रतीकिलो 30 रुपये एवढा धरला तर वर्षाला 12 कोटी पेक्षा जास्त एवढी रक्कम होते. महाडिकांच्या 28 वर्षाचा सत्तेचा हिशोब केला तर जवळपास 300 कोटी रुपयांचा ढपला महाडिकांनी पाडला आहे.
कारखान्यात गाळप होणाऱ्या चार लाख टन उसापैकी तीन लाख टन उस कारखान्याच्या पाच किलोमिटर परिसरातच आहे. असे असतानाही वाहतूक खर्च जादा कसा काय? महाडिकांनी कारखान्याच्या सत्तेच्या माध्यमातून स्वत:ची घरे भरली. सभासदांना मात्र देशोधडीला लावले. त्यांनी कारखान्याचे वाटोळे केले, अशी टीका माने यांनी केली.
आमदार सतेज पाटील म्हणाले, राजारामला चांगल्या रिकव्हरीचा ऊस गाळपास पाठवूनही महाडिकांनी अन्य कारखान्यापेक्षा 200 रुपये कमी दर देऊन शेतक-यांचे आर्थिक नुकसान केले. सभासदांना वा-यावर सोडणा-या सत्ताधा-यांना त्यांची जागा दाखवून द्या.
यावेळी आमदार राजूबाबा आवळे, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, किरण माळी, प्रकाश पाटील, बी. एम. माळी, बी. एल. शिंगे, अभिजीत भंडारी, उदय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला सरपंच जयश्री जाधव, लाटवडेचे माजी सरपंच संभाजीराव पवार, डॉ.धर्मवीर पाटील, महेश चव्हाण, अजयसिंह पाटील, मानसिंग खोत, पोपटराव माने, रंगराव माने, आर. ए. पाटील, दिपक देसाई, महावीर देसाई, हंबीरराव पसारे, आण्णासो महेकर, विलास नरुटे, गोरख कुंभार, बबन कुंभार यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!