
कोल्हापूर: मराठी मालिका विश्वातून थेट 83 (एटी थ्री) ह्या बॉलीवूडपटात झळकलेला आणि स्टार क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा चिरंजीव अभिनेता चिराग पाटील आणि गोव्याच्या किनाऱ्यावर गीताद्वारे रुपेरी वाळू सोनेरी लाटांवर स्वार झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे यांच्या लव्हस्टोरीने सजलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे!’ हा सिनेमा 5 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने चिराग आणि सिद्धी हे प्रथमच एकत्र आले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीला हवा असलेला आणि ह्या सिनेमाच्या कथानकाला साजेसा असा उंच शरिरयष्टी आणि देखणा नायक चिरागच्या रुपाने मिळाला आहे. म्युझिक अल्बमच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली सौंदर्यवती सिद्धी पाटणेची रोमँटीक साथ चिरागला लाभली आहे. रीयल लाईफमध्ये स्टाईल आयकॉन असणाऱ्या ह्या दोन्ही कलाकारांची मराठी पाऊल पडते पुढे ह्या सिनेमातील केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहाणं औत्सुक्याचे ठरेल.
मराठी माणूस हा केवळ नोकरीत रमणारा नाही तर व्यवसायात उतरून नोकरी देणारा होऊ शकतो असे वातावरण हा चित्रपट निर्माण करेल ,अशी ग्वाही निर्माता प्रकाश बाविस्कर यांनी ह्या प्रसंगी दिली.
चित्रपटाच्या संदर्भात कोल्हापूर येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेस निर्माते प्रकाश बाविस्कर, चित्रपटाचा मुख्यअभिनेता चिराग पाटील व मुख्यअभिनेत्री सिद्धी पाटणे हे उपस्थित होते.
समस्त मराठी मन आणि मनगटे मजबूत करण्यासाठी निर्माता प्रकाश बाविस्कर यांची निर्मिती व शिवलाईन फिल्म्सची प्रस्तुती असलेला मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट ५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
लेखक-दिग्दर्शक म्हणून स्वप्निल मयेकर यांनी काम पाहिले आहे.या चित्रपटाचे म्युझिक लाँच ज्येष्ठ विधीज पद्मश्री ॲड.उज्ज्वल निकम यांचे हस्ते करण्यात आले आहे.
अकात फिल्म्सचे चंद्रकांत विसपुते हे ह्या चित्रपटाचे सहनिर्मात आहेत. संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी सिनेमाची सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. स्वप्नील मयेकर लिखित-दिग्दर्शित तसेच चिराग पाटील, सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय क्षेमकल्याणी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच मराठी तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारा आणि भविष्याप्रती जागरुक करणारा ठरेल असे निर्माते प्रकाश बाविस्कर म्हणाले.
Leave a Reply