
कोल्हापूर / प्रतिनिधी : कुठलीही कंपनी एकहाती चालत नाही. संघटना व प्रशासन दोहोंची भूमिका महत्त्वाची आहे. संघटना व प्रशासन यांच्यातील समन्वय वीज क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक आहे. तेंव्हा नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक प्रकल्प तथा मानव संसाधन प्रसाद रेशमे यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या २२ व्या द्विवार्षिक अधिवेशन प्रसंगी बोलताना केले. “वीज कंपन्यांच्या लोकाभिमुख सक्षमीकरणासाठी व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांची भूमिका या विषयावर ते बोलत होते.
पुढे बोलताना श्री. रेशमे म्हणाले की, १०० टक्के विद्युतीकरण साध्य करण्याचे आवाहन आपण वीज मंडळ असताना पेलवले.कंपनी करणानंतर विजेचा तुटवडा ते मुबलक उपलब्धता हा टप्पा आपण गाठला आहे. कंपन्या टिकवायच्या असतील तर आपणाला बदलाला सामोरे गेले पाहिजे. मार्च महिन्यात वीज बिल वसुली चांगली झाली आहे. भविष्यात हा आलेख असाच चढता ठेवणे आवश्यक आहे. ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी ४५ हजार कोटींचा आराखडा आखला आहे. शेतीला दिवसा विजेसाठी उपकेंद्राजवळ २ ते ५ मेगावॉटचे सौर प्रकल्प उभारण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजनेत उस्फुर्त सहभाग नोंदवावा. पदविकाधारक अभियंत्याना कसा न्याय देता येईल, यावर निर्णय घ्यावा लागेल. कंपनीच्या सक्षमीकरणासाठी आपण सक्षम आहोत. तेंव्हा एकजुटीने काम करूयात, असे आवाहन श्री. रेशमे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे २२ वे द्विवार्षिक अधिवेशन दि.२९ एप्रिल व ३० एप्रिल रोजी कोल्हापुरात संपन्न झाले. या अधिवेशनाचा आज समारोप करण्यात आला.या अधिवेशनाला राज्यभरातून ५ हजार कार्यकर्ते उपस्थिती होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महापारेषणचे संचालक प्रकल्प नसीर कादरी, महानिर्मितीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजूरकर, निवृत्त अप्पर कामगार आयुक्त विजयकांत पाणबुडे, राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष एन. बी. जारोंडे, महासचिव ए. व्ही. किरण, समन्वयक डॉ. के. पी. स्वामीनाथन कार्याध्यक्ष एस. के . हनवते, सरचिटणीस प्रेमानंद मौर्य, मुख्य संघटक वाय.के.कांबळे, केंद्रीय अध्यक्ष डॉ.संजय घोडके, मुख्य अभियंता परेश भागवत, मागासवर्गीय वरिष्ठ अभियंता व अधिकारी संघटनेचे अध्यक्ष वाय.डी. मेश्राम, मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापारेषणचे संचालक प्रकल्प नसीर कादरी म्हणाले की, मागासवर्गीय संघटन एकमेव आहे. ज्यात सर्व स्तरातील कर्मचारी हे सभासद आहेत. आज आपल्या सर्वांशी हितगुज करायला मिळाले ही आनंदाची बाब आहे.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके म्हणाले की, वीज बिल वसुलीत मागासवर्गीय संघटनेच्या सभासदांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या मेहनतीमुळे हे शकय झाले आहे. कायद्यामधील बदलामुळे महसूल अधिक देणाऱ्या भागात खाजगी कंपन्या समांतर परवान्याद्वारे शिरकाव करू पाहत आहेत. ते धोक्याचे आहे. संघटना व व्यवस्थापन हातात हात घालून कंपनीची प्रगती करू शकतात. मागासवर्गीय संघटना नेहमीच व्यवस्थापनास सहकार्य करीत आली आहे. तेंव्हा संघटनेने मांडलेल्या रास्त प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा.
एस. के. हनवते यांनी खाजगीकरण धोरणाचा संघटनेने विरोध करावा, अशी भूमिका प्रास्ताविकात मांडली. तसेच मागासवर्गीयांचा अनुशेष लवकर भरून काढावा. तिन्ही कंपन्यांत अनुकंपा भरतीचे धोरण समान असावे. महापारेषणमधील कर्मचारी आकृतीबंध आराखडा पारदर्शीपणे राबविण्यात यावा. महानिर्मिती कंपनीतील जुने संच बंद न करता त्यांचे सक्षमीकरण करावे. लघु जलविद्युत प्रकल्प खाजगी कंत्राटदाराकडे न देता महानिर्मितीनेच चालवावेत,असे स्पष्ट केले. कंपनीचा महसूल वाढतो आहे. शेतीपम्प वीज बिल थकबाकी शासनाने भरावी. विशेष वीज चोरी मोहिमा राबवाव्यात.असे सूचित केले.
द्वितीय सत्रात कार्यकर्ता प्रबोधन व संघटनेच्या आगामी वाटचालीसाठी दिशा दिग्दर्शन यावरील चर्चासत्र संपन्न झाले. यात निवृत्त अप्पर कामगार आयुक्त विजयकांत पाणबुडे यांनी कामगार कायद्यावर सखोल मार्गदर्शन केले.
स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस.पाटील म्हणाले की, रमेश रंगारी यांनी संघटनेला वैचारिक चालना दिली.एकदा कार्यकर्ते विचारांनी भारावले तर काहीही करू शकतात.
स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एन.बी.जारोंडे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी अधिवेशनातून विचारांची शिदोरी घेऊन जावे. व इतर कार्यकर्ते सक्षम कसे होतील हे पहावे. कार्यकर्त्यांनी वाचन, चिंतन व मनन करणे आवश्यक आहे. त्यातून तो प्रश्नांची उत्तरे शोधतो. अशा कार्यकर्त्यांच्या एकत्रिकरणातून व्यवस्था बदलणारी चळवळ निर्माण होते. भूतकाळातील संदर्भ गाठीशी ठेवून भविष्यात दमदार वाटचाल संघटनेने केली पाहिजे. संघटनेच्या वाढीत अनेक कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळेच आज संघटनेने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. या अधिवेशन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राधिका माने तर आभारप्रदर्शन अमोल माने यांनी केले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी संघटना सरचिटणीस प्रेमानंद मौर्य, केंद्रीय उपाध्यक्ष आर. एस..कांबळे व कोल्हापूर परिमंडळातील सर्व पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले.आजच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतू गोपीनाथ लोखंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
Leave a Reply