
पुणे:महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनची सर्वसाधारण सभा व निवडणूक दिनांक 11 मे २०२३ रोजी डी वाय पाटील विद्यापीठ आकुर्डी पुणे येथे संपन्न झाली.या निवडणुकीत एकूण 27 जिल्ह्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता. सदर सभेत 2023 ते 2027 या कार्यकाळासाठी भारतीय फेन्सिंग महासंघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज बंटी पाटील यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँडव्होकेट सागर तानाजी पवार यांनी काम पाहिले तर भारतीय फेन्सिंग महासंघाचे निरीक्षक म्हणून श्रीमती अनघा वरळीकर तर महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे निरीक्षक म्हणून प्राध्यापक निलेश जगताप यांची उपस्थिती होती.महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी बुलढाण्याचे श्री शिवाजीराजे जाधव सरचिटणीस छत्रपती संभाजीनगरचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा डॉ उदय डोंगरे तर खजिनदारपदी धाराशिवचे श्री राजकुमार सोमवंशी यांच्यासह 4 उपाध्यक्ष, 4 सहसचिव, 13 कार्यकारिणी सदस्य अशा एकूण 25 जणांची बिनविरोध निवड झाली आहे.महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोलताना सतेज पाटील म्हणाले महाराष्ट्रामध्ये फेन्सिंग खेळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचविला जाईल, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्रीडा साहित्य, गुणवंत क्रीडा प्रशिक्षक यांची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अनेक गुणवंत खेळाडू आहेत या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळण्यासाठी व जास्तीत जास्त खेळाडू आशियाई व ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरावेत यासाठी अद्यावत फेन्सिंग अकॅडमीची उभारणी लवकरात लवकर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी सतेज पाटील यांची निवड झाल्याबद्दल क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून फेन्सिंग खेळाडू, प्रशिक्षक व संघटकामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a Reply