
कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी आज विधान भवनच्या प्रवेश द्वारावर आंदोलन केले.हद्दवाढीसाठी मुख्यमंत्री व नगर विकासमंत्री यांना निवेदन, अधिवेशनात लक्षवेधी, तारांकित प्रश्न आणि आंदोलन करूनही शासन कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्याबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याबद्दल आमदार जाधव यांनी संताप व्यक्त केला.आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी माझे पती व दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आग्रही होते. त्यांच्या माघारी पोटनिवडणुकीतील विजयानंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विद्यमान मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन दिले होते. मी आमदार झाल्यापासूनच्या प्रत्येक अधिवेशनात तारांकित प्रश्न, लक्षवेधीच्या मधून शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे. हद्दवाढीबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करूनही, कोल्हापूरच्या बाबतीत शासनाची भूमिका दुप्पटीपणाची आहे. इतर शहरांची हद्दवाढ अनेक वेळा होते. परंतु कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेल्या पन्नास वर्षापासून रखडलेला आहे. याकडे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी आज विधान भवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन करत, शासन विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.गेल्या पन्नास वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ रखडली आहे. कोल्हापूरनंतर स्थापन झालेल्या अनेक महानगरपालिकांची एकदा-दोनदा नव्हे, तर अनेकदा हद्दवाढ झाली. त्यामुळे त्या शहरांचा विकास झाला. परंतु कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याने, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येत आहेत. परिणामी शहराच्या सर्वांगीण विकास खुंटला आहे. कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे अशी जनभावना आहे. आणि त्यासाठी नागरिकांनी वारंवार आंदोलने केले आहे. परंतु शासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. राज्याच्या सर्वोच्च सभागृहात या प्रश्नावर मी वारंवार आवाज उठवला आहे. मात्र, त्याकडेही शासन दुर्लक्ष करीत असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हद्दवाढ करणे गरजेचे बनले आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्ताव शासनाकडे प्रलंबीत आहे. या प्रस्तावास शासनाने त्वरित मंजुरी द्यावी, ही माझी न्यायीक मागणी आहे. आज केवळ विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. शासनाने त्वरित हद्दवाढ केली नाही तर भविष्यात हद्दवाढीसाठी कोल्हापूरतील जनतेसोबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार जाधव यांनी यावेळी दिला.
Leave a Reply