कोल्हापूर युवा पत्रकार संघाची दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

 

कोल्हापूर युवा पत्रकार संघ सदस्यांची परिचय केंद्राला भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : युवा पत्रकार संघ, कोल्हापूर येथील पत्रकार सदस्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविद्यपूर्ण कार्याची माहिती जाणून घेतली. दिल्ली अभ्यासदौ-यावर असणा-या युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्यासह 14 पत्रकारांनी कार्यालयास भेट दिली. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांचे श्री. शिवाजी शिंगे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी औपचारिक वार्तालाप झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविद्यपूर्ण माहिती प्रभारी उपसंचालक अरोरा यांनी दिली. महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यातयेणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची विस्तृत माहितीही श्रीमती अरोरा यांनी दिली.
यावेळी युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजी शिंगे यांनी पत्रकार दिल्ली अभ्यास दौरा 2023 आयोजना मागचा हेतु सांगितला. राज्यसभा आणि लोकसभा याद्वारे देशाचे निर्णय कसे घेतले जातात त्याचे प्रत्यक्ष भेट देऊन कामकाज पाहिल्याचे त्यांनी सांगितले. शिंगे यांनी युवा पत्रकार संघ स्थापन करण्यामागचा हेतु स्पष्ट केला. तसेच युवा पत्रकार संघामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम याचे विवेचन केले. गेली 13 वर्ष युवा पत्रकार संघ संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा येथील पत्रकारांसाठी शिखर संस्था म्हणून काम करत असल्याचे नमूद केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, कू, फेसबुक पेजेस, युटयुबचॅनेल, ब्लॉग, इंस्टाग्राम, व्हॉटसॲप ग्रुप आदीं समाज माध्यमातून शासनाची प्रभावीपणे करण्यात येणारी प्रसिध्दी कार्याची श्रीमती अरोरा यांनी माहिती दिली. सर्व पत्रकार सदस्यांना यावेळी लोकराज्य अंकाच्या प्रती भेटस्वरुपात देण्यात आल्या.
यावेळी राज्य सरचिटणीस अजय शिंगे, राज्य संघटक नियाज जमादार, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शरद माळी, कोल्हापूर शहर अध्यक्ष रविराज कांबळे, राज्य सदस्या अक्षता नाईक, पुष्पा पाटील, सदस्य उदय पाटील, विजय पोवार, अक्षय थोरवत, शुभांगी तावरे, श्रद्धा जोगळेकर उपस्थित होते. युवा पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष विवेक पोरलेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!