
कोल्हापूर : ऐतिहासिक गांधी मैदान ही कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापुरातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानात घडले आहेत. या मैदानाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांनी परिपूर्ण आराखडा तयार करून घेतला होता व त्यासाठी निधी मिळावा, याकरिता शासन दरबारी पाठावर करत होते. त्यांच्या माघारी मी तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्यासोबत यासाठी पाठपुरावा केला आणि मैदानासाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या कामासाठी आपलाच पाठपुरावा असल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.दिवंगत आमदार चंद्रकांत आण्णा व आमदार जयश्री जाधव यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मैदानासाठी निधी मंजूर केला होता. मात्र, लोकांची वरात घाल माझ्या दारात अशा प्रवृत्तीची लोक या कामाचे श्रेय घेऊन कोल्हापूरकरांची दिशाभूल करत आहेत असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवीकिरण इंगवले यांनी लगावला.आमदार जयश्री जाधव यांनी आज गांधी मैदानाला भेट देऊन पाच कोटीतून करण्यात येणाऱ्या कामाची पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, रवीकिरण इंगवले, इंद्रजीत बोंद्रे, अजय इंगवले, संपत चव्हाण-पाटील, करण शिंदे, सुरेश पाटील, बाबू घाडगे, अमर सासणे, नंदू तिवले, प्रताप पाटील, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, अनिरुद्ध कोरडे यांच्या सहभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार जाधव यांनी संपूर्ण गांधी मैदानाच्या भोवतीने पाहणी करून अधिकाऱ्यांना काम गुणवत्ता पूर्ण झाले पाहिजे अशा सूचना दिल्या.आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, मध्यवस्तीतील गांधी मैदान ही कोल्हापूर शहराची अस्मिता आहे. अबाल- वृद्ध, युवक, मुले खेळ, व्यायाम आदीकरिता या मैदानाचा नित्यनियमित उपयोग करतात. मात्र, गेल्या काही वर्षात गांधी मैदानात सांडपाणी येते आहे. त्यामुळे मैदानास तलावाचे स्वरूप येत असून, मैदानाचे वारंवार नुकसान होत आहे. त्यामुळे मैदानाचा सर्वांगीण विकास करून खेळाडू व नागरिकांना परिपूर्ण सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तत्कालीन पालकमंत्री व विधानपरिषद काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही मैदानासाठी निधी दिला आहे.मैदानात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज व क्रॉसड्रेनचे काम तातडीने करणे गरजेचे होते. यासाठी नगर विकास विभागाने ५ कोटींचा निधी मंजूर केला असून, यामधून महाराष्ट्र हायस्कूल ते सरदार चौक ते अपना बँक ते उभा मारुती ते साकोली कॉर्नर पर्यंत व गांधी मैदान लगतची स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज व क्रॉसड्रेनचे काम करण्यात येणार आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू असून, लवकरच या कामास सुरवात होणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.याच बरोबर गांधी मैदानाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, स्प्रिंकलर सिस्टीम बसविणे, इनडोअर खेळांसाठी हॉल बांधणे व साहित्य पुरवणे, गॅलरी बांधणे, इलेक्ट्रीकल व्यवस्था करणे या उर्वरित कामासाठी निधी मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले आहे.
Leave a Reply