
कोल्हापूर : आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांना भेटी देऊन, कोल्हापूरकरांची दिशाभूल करण्याऐवजी त्यांना निधी मंजूर करून आणण्याचा अधिकार असेल तर त्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करावेत, त्या निधीसाठी पाठपुरावा करावा आणि निधी मंजूर करून आणून आणि त्याचे श्रेय घ्यावे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असे मत आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले.आमदार जाधव यांनी आज हुतात्मा पार्कला भेट देऊन मॉर्निंग वॉकला आलेला नागरिकांशी संवाद साधला व महापालिका अधिकारी व ठेकेदारांची आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार जाधव बोलत होत्या. हुतात्मा पार्क सुशोभीकरणाचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करावे अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका अधिकारी व ठेकेदार यांना दिली.आमदार जाधव म्हणाल्या, हुतात्मा पार्क व महावीर गार्डनच्या सुशोभिकरणाचा आराखडा दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांनी तयार केला होता. त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील साहेब यांनी दोन टप्यात जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर केला होता. आराखडा आण्णांचा, पाठपुरावा माझा, निधीला मंजुरी दिली सतेज पाटील साहेबांनी आणि त्याचे श्रेय घेत आहेत जनतेने नाकारलेले. पंरतु दिशाभूल करण्याचे काम त्यांनी करू नये, कोल्हापूरकरची जनता सुज्ञ आहे.दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांनी शहराच्या विकासाचे रोल मॉडेल तयार केले होते. कोल्हापूर शहरातील सर्व मैदाने व क्रीडांगणाचा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी विस्तृत व परिपूर्ण आराखडे तयार करून घेतले होते. गांधी मैदान, दुधाळी पॅव्हेलियन, बावडा पॅव्हेलियन, सासने मैदान, शिवाजी स्टेडियम, महावीर गार्डन, हुतात्मा पार्क, रस्ते (नगरोत्थान योजना), रंकाळा या कामांसाठी निधी मिळावा म्हणून आण्णांचा शासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. तोच पाठपुरावा मी पुढे घेऊन जात आहे. या आराखड्यांना आता निधी मंजुर झाला आहे. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे. यामुळे या कामाच्या ठिकाणी जाऊन आपणच त्याचा पाठपुरावा केला, असे दाखवून देण्याचा खटाटोप काहीजण करीत आहेत. त्यांनी कितीही दिशाभूल केली तरी कोल्हापूरची सुज्ञ जनता भूलणार नाही असा विश्वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला.शहराचे प्रतिनिधी म्हणून काम करताना, ओपन जिम, टर्फ आदी त्यांनी केलेल्या विकासकामाची गुणवत्ता व सद्यस्थिती याची अनुभूती संपूर्ण कोल्हापूरकर घेत आहेत असे मत आमदार जाधव यांनी व्यक्त केले.महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या विकासकामांच्या निधींना स्थगिती देऊन, तो विकास निधी इतरत्र कामांसाठी वळवणे हे कोल्हापूराच्या विकासासाठी घातक आणि दुर्दैवी असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.हुतात्मा पार्क येथे मध्यवर्ती स्मारकाचे पूनरज्जीवन करून, बलिदान दिलेल्या हुतात्मांच्या नामफलकाची उभारणी, कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसे ऑपन थिएटरची निर्मिती, पदपथ, लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही, वीज व्यवस्था, पाणी व्यवस्था, योगा हॉल, प्रवेशद्वार, ओपन जीम व स्वच्छतागृह आदी कामे करण्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करून, दिवाळीपूर्वी ही सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत अशा सूचना आमदार जाधव यांनी दिली.यावेळी शहर अभियंता हर्षजीत घाटगे, सुरेश पाटील, आर्किटेक्ट प्रशांत हाडकर, माजी नगरसेवक विनायक फाळके, बाळासाहेब नचिते, पांडुरंग पाटील, चंद्रकांत कांडेकरी, शहानुर देसाई, बॉबी सांगलीकर, नंदकिशोर देशपांडे, मुनीर मोमीन, रावसाहेब शिंदे, नंदकुमार नलवडे, शिवाजी नलवडे, इनायतुला गडकरी, मारुतीराव चौगुले, राम डवाळे, दिनकर मगदूम आदी उपस्थित होते.
Leave a Reply