
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)चा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक आहे तसेच गोकुळमार्फत सेवा सुविधा इतरापेक्षा जास्त दिल्या जातात. गेल्या काही महिन्यापासून गाईच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे. कोरोनानंतर गाय/म्हैस दुधाला चांगली मागणी होती त्यामुळे मागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती होते. त्यामुळे उत्पादकांना दुधाला चांगला खरेदी दर देता आला. त्याबरोबरच बटर व दूध पावडरीचे दरही वाढत राहिले होते. परिणामी गेल्या दोन वर्षात प्रतिलिटर १० ते ११ रुपयांची दूध दरवाढ करण्यात आली. या परिस्थितीमुळे गाय खरेदी करण्यावर दूध उत्पादकांनी भर दिला. यातून गाय दुधाचे उत्पन्न वाढले आहे. यापूर्वी गाय दुधास ३५ रुपये प्रतिलिटर्स दर दिला जात होता.गेल्या दोन महिन्यांत बाजारपेठेतील गाय दूध पावडर, लोणी यांचे दर खूपच कमी झाले आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये गाय लोणी दर प्रति किलो ४५०/- रुपये होता तो आज ऑक्टोबर २०२३ मध्ये ३५०/- रुपये प्रति किलो इतका झाला आहे. तसेच फेब्रुवारी २०२३ मध्ये गाय दूध भुकटीचा दर २८०/- रुपये प्रति किलो असा होता तो ऑक्टोबर २०२३ मध्ये २४०/- रुपये प्रतिकिलो असा आहे. सरासरी पाहता गाय लोणी व गाय दूध भुकटीचे दर प्रतिकिलो ५० ते १०० रुपयांनी कमी झाले आहेत. त्या अनुषंगाने गोकुळने तसेच इतर सर्वच दूध संघांनी (अमूलसह) ऑक्टोबर२०२३ मध्ये गाय दूध खरेदी दरात कपात केली असून सध्या प्रतिलिटर ३१ ते ३३ रुपये इतका दर दिला जात आहे. त्या अनुषंगाने काही ठिकाणी आंदोलने झाली. या पार्श्वभूमीवरती गाय दूध खरेदी दर कपातीबाबतची खरी परिस्थिती आंदोलनकर्त्यां दूध उत्पादकांनी जाणून घेणे फार महत्वाचे आहे.गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांचा विचार केला आहे. दूध उत्पादक हेच संघाचे मालक आहेत गाय दूध दर कमी करण्याचा निर्णय हा नाईलास्तव घेण्यात आला आहे. कारण कोणतीही संस्था ही ताळेबंदावरती अवलंबून असते त्यामुळे भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊन चालत नाही. दुग्धव्यवसायाच्या बाजारपेठचा अभ्यास करून त्याची चर्चा व विचार करून दराबाबतचे किंवा इतर धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात.
Leave a Reply