
कोल्हापूर : महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त शतचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचे औचित्य साधून फर्टीमीन व फर्टीमीन प्लस या उत्पादनांचा ५ किलो पॅकिंग मधील विक्री शुभारंभ व पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपचे उद्घाटन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभहस्ते व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थित संपन्न झाले.या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघ हा नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी प्रयत्नशील असून पशुखाद्य हा दुग्ध व्यवसायाचा पाया असल्याने सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे. म्हणूनच जिल्ह्यात सुमारे ९० ते ९५ % लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात. गोकुळ हा दूध उत्पादकांचा संघ आहे या भावनेतून सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेत आहोत. गोकुळ संघ मातृ संस्था असून दूध उत्पादकांच्या हितासाठी नवनवे उपक्रम राबवत असते उत्पादकांनी मागणी केलेले पशुखाद्य वेळेत पोहोच व्हावे यासाठी गोकुळने पशुखाद्य मागणीचे मोबाईल ॲप आजपासून सुरु केले आहे. या ॲप चा फायदा प्राथमिक दूध संस्थांना नक्कीच होईल व कामकाजात सुसूत्रता येईल असे मनोगत व्यक्त केले. यावेळी महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमूडशिंगी व कागल एम.आय.डी.सी. येथे प्रतिदिनी ६०० टन इतके उत्पादन घेतल्यामुळे येथील कर्मचारी यांचे आमदार सतेज पाटील यांनी कौतुक केले. यावेळी बोलताना गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, फर्टीमीन व फर्टीमीन प्लस ५ किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध व्हावे अशी मागणी संपर्क सभे मधून आल्याने त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन फर्टीमीन व फर्टीमीन प्लस ५ किलो पॅकिंग मध्ये उपलब्ध करून दिले आहे. तसेच पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून पशुखाद्याची मागणी नोंद करणे, मागणीची स्थिती, क्रेडीट मेमो, येणे देणे रक्कम, खाते उतारा अशी सविस्तर माहिती दूध संस्थांना समजणार आहे. सर्व संस्थांनी या मोबाईल ॲप चा वापर करावा असे आवाहन चेअरमन डोंगळे यांनी केले.
Leave a Reply