दसरा चौकात होणार वचनपूर्ती लोकसोहळा : सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांचा नागरी सत्कार

 

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेची वचनपूर्ती झाली असून या वचनपूर्तीचा सर्व पक्षीय गौरव आज, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता दसरा चौक येथे होत आहे. या योजनेकरिता मोलाचे योगदान देणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्यासह काही मान्यवर व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

ऐतिहासिक दसरा चौकात हा गौरव सोहळा शाहू छत्रपती यांच्या हस्ते तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा गौरव करण्यात येणार आहे. सर्व पक्षीय गौरव समितीच्या वतीने आयोजित सोहळ्यास शहर आणि परिसरातून विविध पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूरकरांची सन १९९० पासूनची स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठ्याची मागणी होती. त्यासाठी शहरात सर्व पक्षीय आंदोलन उभारले होते. यासाठीच शिंगणापूर योजना राबविण्यात आली. पण थेट पाइपलाईनचा आग्रह मात्र कायम राहिला. सन २००८ नंतर आमदार सतेज पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घातले. सुदैवाने त्यांना पालकमंत्रिपदाची संधी मिळाली. २०१४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत योजना मंजूर करून आणायची असा निर्धार त्यांनी केला. २०१४ पासून २०२३ अशा तब्बल नऊ वर्षात अनेक प्रशासकीय, तांत्रिक, नैसर्गिक संकटांचा सामना करत ही योजना पूर्ण झाली. कोल्हापूरकरांना दिवाळीची भेट म्हणून थेट पाईपलाईनचे पाणी मिळाले. थेट पाईपलाईनचे शिल्पकार म्हणून आमदार सतेज पाटील यांचा वचनपूर्तीनिमित्त आज गौरव करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!