
कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. मुख्यमंत्री यांच्या कामांमुळे जनमानसात त्यांची लोकप्रियता वाढत आहे. शिवसेनेचे सर्व बालेकिल्ले पुन्हा काबीज करण्यासाठी शिवसेना सज्ज असून, २०२४ ला दक्षिणोत्तर शिवसेनेचाच भगवा फडकेल, अशी गर्जना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.
शिवसैनिकांच्या उत्साहाने आणि जल्लोषी वातावरणात राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा करीत “संघर्ष हीच माझी ओळख, जनतेच्या साथीने पुन्हा भगवा फडकविणार” अशी गर्जनाच श्री.क्षीरसागर यांनी केली. शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिक, कार्यकर्ते आणि समर्थकांनी वेगवेगळ्या गटाने शुभेच्छा देण्याकरिता गर्दीचा उच्चांक करून जणू शक्तीप्रदर्शन केले. यातून शिवसैनिकांसह, शहरातील तालीम संस्था, मंडळांचे कार्यकर्ते यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत यांनाच पुन्हा विधानसभेत पाठविण्याचा निर्धार केला. वाढदिवस शिवसैनिक व कार्यकर्त्यांच्या उत्सहात संपन्न झाला. सायंकाळी शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शनिवार पेठ येथे क्षीरसागर कुटुंबीय, मान्यवर आणि शिवसैनिक, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. यावेळी प.म.देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, स्नुषा सौ.दिशा क्षीरसागर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या महिला भगिनींनी औक्षण ओवाळले. यानंतर भव्य आतषबाजी, वाद्यांच्या गजरात शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत उत्तरसह दक्षिण मतदारसंघातील काही प्रभाग यात समाविष्ठ आहेत. यासह शहराला लागून असलेली गावेही यामध्ये आहेत. यापूर्वी आमदार या नात्याने कार्यरत असताना कोल्हापूर उत्तर विधानसभा कार्याक्षेत्रास प्राधान्य दिले गेले. पण, सध्याचे वाढलेले वसाहती करण, नव्याने निर्माण झालेली उपनगरे ही बहुतांश दक्षिण विधानसभा क्षेत्रात आहेत. याठिकाणच्या नागरिकांसह शहराशेजारच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गावांमध्ये मुलभूत सोयी सुविधाचा वाणवा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी दक्षिणच्या नागरिकांचा निव्वळ राजकारणासाठी उपयोग करून घेतला. त्यांच्या दुर्लक्षामुळेच दक्षिण मतदारसंघ भकास झाला. दक्षिण मधील नागरिकांच्या मागणीस मान देवून त्याठिकाणी विकास कामाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले गेले. मतदारसंघाचा कोणताही भेदभाव न ठेवता दक्षिण व उत्तर दोन्ही मतदारसंघात दक्षिणोत्तर विकास पर्वाची सुरवात केली आहे. या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेस मानणारा मोठा वर्ग असून, गेल्या सर्वच निवडणुकीत याचा प्रत्यय आला आहे. उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला असून, दक्षिण मतदारसंघ काबीज करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात नागरिकांचे प्रेम, आशीर्वाद मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. विकास, सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दोन्ही मतदारसंघात सुरु असलेला जनसंपर्क उपस्थित शिवसैनिक आणि हितचिंतकांच्या प्रेमातून दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, अशी गर्जना केली.
दरम्यान आज दिवसभरात शिवसेना मुख्यनेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे, युवा सेना अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदे, उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सा.बा.मंत्री रविंद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर, यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. खासदार संजय मंडलिक यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
पांजरपोळ येथे गोमातेचे पूजन करून गाईना डाळ, गुळ, चारा वाटप करण्यात आले. यानंतर शिवसेना शहर वतीने कोल्हापूर थाळी, उत्तरेश्वर पेठ यांचे वतीने उत्तरेश्वर थाळी व चादर, शिवसेना विभाग शिवाजी पेठ यांच्यावतीने श्री अंबाबाई भक्त मंडळ येथे मोफत अन्नदान करण्यात आले. युवा सेनेच्या वतीने श्री अंबाबाई मंदिर येथे, शिवसेना विभाग राजारामपुरी यांचे वतीने श्री मारुती मंदिर, शिवसेना विभाग कसबा बावडा यांचे वतीने ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर येथे अभिषेक अर्पण करून राजेश क्षीरसागर यांना उदंड आयुष्य लाभावे, असे साकडे घातले. यासह शिवसेना तालुका गडहिंग्लज यांचेवतीने उपजिल्हा रुग्णालय येथे आणि शिवसेना दक्षिण विभागाच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रम येथे फळेवाटप करण्यात आले. यानंतर शिवसेना शाखा मित्रप्रेम यांचेवतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
Leave a Reply