डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये एआरटी सेंटरचा शुभारंभ

 

कोल्हापूर:डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एआरटी सेंटर (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) सुरु करण्यात आले आहे. जिल्हा एडस कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ झाला. या सेंटरमध्ये एचआयव्ही रुग्णांना कायमस्वरुपी मोफत सेवा आणि उपचार मिळणार आहेत.डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांच्या संकल्पनेतून हे एआरटी सेंटर सुरू करण्यात आले आहे.एचआयव्हीचा फैलाव रोखण्यासाठी आणि एडस ग्रस्त रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच रुग्णांना अन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या एआरटी सेंटरद्वारे उपचार सुविधा मिळणार आहे. एडस ग्रस्त रुग्णांनी या ठिकाणी उपचारांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. मुदगल यानी केले.एचआयव्ही एड्सबाबत सातत्याने केल्या जात असलेल्या जनजागृतीमुळे जिल्ह्यात एडस रुग्णाची संख्या नियंत्रणात आणण्यात चांगले यश मिळाले आहे. डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलच्या या एआरटी सेंटरमुळे एड्स नियंत्रण मोहिमेला अधिक बळ मिळेल असा विश्वास दीपा शिपूरकर यांनी यावेळी व्यक्त केला.दरम्यान एडस दिनानिमित्त पॅथॉलॉजी विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा एडस कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेशकुमार शर्मा, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ महादेव माने, डॉ. सुचित देशमूख, एआरटी सेंटरचे प्रमुख डॉ. पी.जी चौगुले, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे समन्वय अधिकारी मनीष पवार, डाटा मॅनेजर सुनील पोतदार, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चे समुपदेशक संदीप पाटील, यांच्यासह एआरटी सेंटरचे कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!