गार्डन्स क्लबचे ५३ वे पुष्पप्रदर्शन २३ ते २५ डिसेंबर दरम्यान

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका व गार्डन्स क्लब कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक येत्या शनिवार दिनांक २३,२४ आणि २५ डिसेंबर २०२३ रोजी महावीर उद्यानामध्ये ५३ व्या  पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  पश्चिम महाराष्ट्रामध्ये आगळे वेगळे असणाऱ्या गार्डन्स क्लबच्या या पुष्प प्रदर्शनाची उत्कंठा अनेक निसर्गप्रेमींना लागलेली असते.

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमने  २०२३   या वर्षाकरिता *’बीट प्लास्टिक पोल्युशन’*  ही थीम ठेवली असल्यामुळे गार्डन्स क्लबचे हे पुष्पप्रदर्शन यावर्षी या संकल्पनेभोवती आहे. अशी माहिती गार्डन्स क्लब च्या अध्यक्षा पल्लवी कुळकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पुष्प प्रदर्शनाबरोबरच अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये गुलाब आणि विविध प्रकारची फुले, पुष्परचना,कुंडीतील रोपे, फुले,पाने व पाकळ्यांची रांगोळी, बुके, सॅलड डेकोरेशन,बोनसाय, मुक्तरचना, लँडस्केपिंग इ. च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धांची  सुरुवात  शनिवार दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ  वाजता  शोभा यात्रेने होणार आहे . शोभायात्रेचा शुभारंभ प्रमुख पाहुणे पर्यावरण तज्ञ केतकी घाटे आणि विशेष अतिथी डीवायएसपी ( लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) सरदार नाळे यांच्या हस्ते होणार असून नंतर विविध स्टॉल्सचे उद्घाटन होईल.
यावेळी प्रथमच इतर अनेक स्पर्धांबरोबरच पथनाट्य सादरीकरण स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेसाठी उद्योजिका जिया झंवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
दुपारच्या सत्रामध्ये सर्व पुष्प स्पर्धा  घेतल्या जातील.तसेच उद्यान प्रेमींसाठी विविध वस्तूंचे स्टॉल्स सुरू होतील.
दिनांक २४ डिसेंबर सकाळी नऊ वाजता या पुष्पप्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उद्योजिका मेधा किरण घाटगे यांच्या हस्ते होणार असूनगोकुळ दुध संघाचे माजी संचालक अरुण नरके अध्यक्षपद भूषविणार आहेत. चंद्रकांत मंचरे, जीएसटी डेप्युटी कमिशनर आणि चेतन नरके,विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत.
सकाळी दहा वाजता गार्डन्स क्लब कोल्हापूरचा वार्षिक अंक रोझेट  तसेच २०२४ च्या कॅलेंडरचे प्रकाशन होणार असून उद्यान स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विविध स्पर्धकांना पारितोषिक वितरण समारंभ सकाळी १०.१५ वाजता आयोजिला आहे.
दुपारी १२ वाजता गार्डन्स क्लबच्या ग्रीन स्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी कोर्स कोऑर्डिनेटर डॉ प्रमिला बत्तासे उपस्थित असतील. कार्यक्रमावेळी माजी विद्यार्थी तसेच कोर्सचे शिक्षक यांची मनोगते सादर होतील.
पुष्प प्रदर्शना निमित्त ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या विषयावर घेतल्या गेलेल्या निवडक शॉर्ट फिल्म चे स्क्रीनिंग २४ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० वाजता होणार असून  विजेत्या फिल्मना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके दिली जातील.
सायंकाळी ५.४५  वाजता तरुणाईचे आकर्षण असलेला लाईट्स व डीजे संगीताच्या साथीने होणारा बॉटनिकल फॅशन शो आयोजित केला आहे.या बॉटनिकल फॅशनशोसाठी निसर्गातील पानाफुलांचा वापर करून विविध महाविद्यालयातील युवक युवती भाग घेत असतात.
सोमवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. बीट प्लास्टिक पोल्युशन विषयावर आधारित ही स्पर्धा आयोजित केली असून त्यासाठी वय वर्षे ५ ते ११, १२ ते १२, आणि १७ व त्यावरील, अशी गट विभागणी केली आहे. विजेत्या स्पर्धकांचे पारितोषिक वितरण डॉ. श्रुती कुल्लोल्ली यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी डॉ. सोपान चौगुले विशेष अतिथी असणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार माननीय विलास बकरे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खास सत्कार करण्यात येणार आहे.
२५ तारखेला सकाळी दहा ते अकरा या वेळेत मॅजिक पेंटिंग वर्कशॉप  तसेच ११ ते १२ या वेळेत इझी अँड क्विक पॉट पेंटिंग वर्कशॉप आयोजित केले आहे.
सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता विविध स्पर्धांचे निकाल आणि त्यांचा बक्षीस समारंभ सत्यजित उर्फ नाना कदम – सदस्य, कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संयोगिताराजे छत्रपती असतील. तसेच पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील.हे सर्व कार्यक्रम महावीर उद्यानात होणार असून या फ्लॉवर शोच्या निमित्ताने बागेसंबंधी विविध वस्तूंचे स्टॉल तसेच खाद्य वस्तुंचे स्टॉल असणार आहेत.
या प्रदर्शनाचा लाभ निसर्गप्रेमी व रसिकांनी घ्यावा असे आवाहन गार्डन क्लबच्या अध्यक्षा सौ.पल्लवी कुलकर्णी यांनी केले आहे. पत्रकार परिषदेससचिव सुप्रिया भस्मे, उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, कोषाध्यक्षा प्राजक्ता चरणे, सल्लागर समिती सदस्य शोभा तावडे, शैला निकम,कल्पना थोरात,सतिश कुलकर्णी, कृपेश हिरेमठ, वर्षा वायचळ आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!