
कोल्हापूर/ प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल २५ रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटील व दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मेंदू बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजक्या ८ ते १० रुग्णालयापैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. अशा आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मुंबई, दिल्ली सारख्या मेट्रो शहरात जाण्याऐवजी कणेरी मठ येथे उपचार मिळू शकतात, तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषेदेत केले. पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. या सेवा शृंखलेत रुग्णालयातील संस्कार (मेंदू विभाग) विभागाने मेंदूच्या तब्बल २५ बायपास शस्त्रक्रिया करून एक विक्रम स्थापित केला आहे.आपण नेहमी ह्रदयाच्या बायपास शस्त्रक्रियेबद्दल ऐकत असतो. पण मेंदूच्या अनेक विकारांच्यात बायपास शस्त्रक्रियेची गरज असते, अशा शस्त्रक्रिया भारतात केवळ मेट्रो सिटीमधील तब्बल ८-१० ठिकाणीच होते. अशा शस्त्रक्रिया क्लिष्ट शस्त्रक्रिया असतात त्यामुळे बायपास शस्त्रक्रिया अत्यंत तुरळक प्रमाणात होतात. त्यामुळे एकाच रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत तब्बल २५ शस्त्रक्रिया करण्याची किमया सिद्धगिरी हॉस्पिटलमधील डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडले आहे.सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिल आहे, तसेच वरील सर्व आवश्यक बाबी व अनुभवी डॉक्टर प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के व प्रख्यात न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, सहाय्यक न्युरोसर्जन डॉ.अविष्कार कढव आणि कुशल कर्मचारी यांच्यामुळे ग्रामीण भागात असून हि सिद्धगिरी हॉस्पिटलने अत्यंत कमी कालावधीत ३ ते ४ राज्यातून आलेल्या २५ रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. सर्व रुग्ण आज पूर्णपणे निरोगी आयुष्य जगत आहेत. यावेळी बोलताना पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, “मेट्रो शहरात होरणाऱ्या या शस्त्रक्रियेला तब्बल १० ते १५ लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहेत, मात्र सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अद्यावत तंत्रज्ञान वापरून हि न नफा न तोटा या तत्वावर केवळ गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा म्हणून नाममात्र खर्चात हि शस्त्रक्रिया होत आहे. समाजातील गरजू व गरीब लोकांच्याकरिता आपण हि माहिती आपल्या माध्यमातून पोहचवावी व या सेवेचा लाभ त्यांना द्यावा. ”डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी विविध दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे सदर जटील व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली. यावेळी प्रास्ताविक करताना विवेक सिद्ध यांनी सांगितले कि, डॉ. शिवशंकर मरजक्के हे ब्रेन बायपास, एपिलेप्सी सर्जरी, एंडोस्कोपिक ब्रेन सर्जरी करण्यासाठी भारतातील काही मोजक्या (८-१०) सर्जनांपैकी एक असून त्यांनी सर्वोत्तम न्यूरो इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी सर्जरी क्षेत्रात दोनदा सुवर्णपदक प्राप्त केले असून तब्बल 10000 पेक्षा जास्त गंभीर शस्त्रक्रियांचा अनुभव त्यांना आहे. गेली १० वर्षे सिद्धगिरीत सेवा देत असून रुग्णांनी त्यांच्या कौशल्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तर या पत्रकार परिषदेस सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, न्युरोसर्जन डॉ.आविष्कार कढव, डॉ.निषाद साठे, डॉ.स्वप्नील वळीवडे, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, अभिजित चौगले, सागर गोसावी, प्रसाद नेवरेकर उपस्थित होते.
Leave a Reply