
कोल्हापूर : मध्यप्रदेशातील इंदोर जिल्हा व परिसरात दूध व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढत असून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी संकलन, प्रक्रिया, शीतकरण, वितरण, पशुखाद्य इत्यादींमध्ये महत्त्वपूर्ण पायाभूत गुंतवणुक करणे आवश्यक आहे. दूध, दुग्धजन्य उत्पादने यासारख्या क्षेत्रामध्ये मूल्यवर्धित संधी उपलब्ध आहेत. यामुळे गोकुळ दूध संघ व माही दूध संघ यांना एकत्रीतपणे व्यवसाय वृद्धी करणेसाठी चांगली संधी असल्याचे प्रतिपादन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले. मध्यप्रदेशच्या इंदोर मधील माही सहकारी दूध संघाच्यावतीने महिदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या नवीन दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन शुभारंभ कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी माही दूध संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्री.संजय गोवनी म्हणाले कि, गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर दूध संघ असून गोकुळची दूध व दुग्धजन्य उत्पादने उत्तम गुणवत्तेची आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यासारख्या शहरामध्ये दूधाच्या बाजारपेठेमध्ये गोकुळचे नाव आहे. तसेच दूध उत्पादकांना दर दहा दिवसाला दूध बिल देण्याची अखंडीत पद्धत, दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा अशा गोकुळच्या कार्यपद्धतीमुळे आम्ही प्रभावित झालो असून गोकुळ दूध संघाने या भागात दूध संकलन सुरु करावे.तसेच मध्यप्रदेश मध्ये उत्तम गुणवत्तेचे दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करून देण्यास प्रयन्नशील रहावे असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, माही दूध संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्री.संजय गोवनी, पंचमहल दूध संघाचे मुख्य अधिकारी चिराग पटेल, अतुल वाजपेयी, यशवंत रेड्डी, पी.के.पांडे, महिदपूरचे पोलिस अधिकक्ष बृजेश सक्सेना, सिद्धी विनायक कंपनीचे सुभाष ठाकूर, शेखर क्षीरसागर व मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply