
कोल्हापूर:शिक्षणामुळेच व्यक्ती समृद्ध बनतो. उत्तम शिक्षण हेच भविष्य असून चांगल्या शिक्षणातूनचा स्वत:ची व देशाची प्रगती घडेल. शिक्षण क्षेत्रात नवकल्पना व सातत्यपूर्ण संशोधन गरजेचे आहे. सरस्वती व लक्ष्मी यांचा मेळ घालून कार्यरत राहिल्यास देशासाठी भविष्यकाळ उज्वल असेल असे प्रतिपादन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी तळसंदे येथे काढले.ह. भ. प. यशवंतराव भाऊराव पाटील यांच्या ७० व्या स्मृतीदिनानिमित्त तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटीमधील शांताई सभागृहात ‘इन्वेंशन, इनोव्हेशन अँड इंक्युबेशन इन एज्युकेशन’ या विषयावर डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी ह. भ. प. यशवंतराव भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस्थळी त्यांनी आदरांजली वाहिली.डी. वाय. पाटील ग्रुपमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे २ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. माशेलकर यांनी शिक्षण व त्यामधील नवकल्पना, संशोधन आणि विकास यावर मार्गदर्शन केले. शैक्षणिक क्षेत्रात क्रांती होत असताना डी. वाय. पाटील समुहाने आधुनिक विद्यार्थी घडविण्याचे काम नेटाने सुरू केले असल्याचे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले. यावेळी जडण घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ॠतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता आदी व्यासपिठावर उपस्थित होते.डॉ. माशेलकर म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारल्यानेच भारत राष्ट्र जगात पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तम शिक्षण हेच भविष्य असून त्यासठी इनोव्हेंशन होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाळेत, कोणत्याही भाषेत शिक्षण घ्यावे पण नवं निर्मितीचा ध्यास धरावा. लक्ष्मी आणि सरस्वती यांचा नेहमीच मेळ घातला पाहिजे. आपल्याकडे बुद्धिमत्तेची कमी नाही, मात्र त्याचा वापर आपल्या देशासाठी व्हावा असा प्रयत्न झाला पाहिजे. उत्तम तंत्रज्ञान अवगत करून विद्यार्थ्यांनी आपल्या देशातच ‘गुगुल’ व ‘मायक्रोसॉफ्ट’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन डॉ. माशेलकर यांनी केले.
.
Leave a Reply