डी वाय.पाटील विद्यापीठामध्ये नॅनो टेक्नॉलॉजीवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ

 

कोल्हापूर: जगभरात ऊर्जा निर्मितीचा प्रश्न गंभीर होत असून हरित उर्जा (हायड्रोजन)निर्मिती हि काळाची गरज बनली आहे. निसर्गाचे संवर्धन करून हरित हायड्रोजन निर्माण करण्यासाठी विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या समुद्राच्या पाण्याचा वापर करणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन ऑस्ट्रेलियामधील न्यू कॅसल विद्यापीठाचे प्रा. डॉ. अजयन विनू यांनी केले. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “नॅनोमटेरियल आणि बायोटेक्नॉलॉजीचा मेडिकल क्षेत्रामध्ये वापर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रा. विनू बोलत होते

आजपासून सुरू झालेल्या या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी खलिफा युनिव्हार्सिटी अबुधाबीचे प्रा. डेनीयर चोई, द. कोरियाच्या चुंगअंग विद्यापीठाचे जोन टील पार्क, कोरिया विद्यापीठाचे प्रा. हन यंग वू, अमेरिकेतून डॉ. आसीम गुप्ता, आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. सी. डी लोखंडे, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. जयवंत गुंजकर, डॉ. मेघनाद जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेला दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, अबुधाबी, नायजेरिया, तुर्की या देशातून एकूण १५ शास्त्रज्ञ उपस्थित असून देश विदेशातील ३०० हून अधिक संशोधकांचा सहभाग आहे.प्रा. विनू म्हणाले, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्यापैकी केवळ दोन टक्के पाणी हे शुद्ध स्वरूपात आहे. उर्वरित 98 टक्के पाणी हे समुद्राचे असून याचा वापर हरित हायड्रोजन वायू निर्माण करण्यासाठी करणे गरजेचे आहे. समुद्राच्या पाण्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी नैसर्गिक स्वरूपात मिळत असलेल्या सूर्याच्या उष्णतेचा वापर करणे शक्य आहे. ऊर्जा निर्मितीच्या प्रचलित पद्धतीमध्ये ग्रीन हाऊस गॅसेसचे (CO2) प्रमाण वाढत असल्याने ग्लोबल वॉर्मिंग वाढले आहे. त्यामुळे हरित ऊर्जा निर्मिती हाच ऊर्जेच्या समस्येवरचा मुख्य उपाय ठरेल. या उर्जा निर्माण प्रक्रियेमध्ये नॅनो मटेरियलचा वापर अनिवार्य ठरणार आहे. याबाबत आपण लवकरच देशाच्या ऊर्जा विभागाशी संबंधित प्रमुखांची भेटही घेणार असल्याचे डॉ. वेणू यांनी सांगितलेडी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी नॅनो टेक्नॉलॉजीचे महत्व वाढत असल्याचे नमूद केले. तंत्रज्ञानाचा वापर योग्य दिशेने करून सकारात्मक बदल घडवले तरच खऱ्या अर्थाने विकास साध्य होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. ज्ञान निर्मिती, नॅनो टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यासाठी १५ देशातील शास्त्रज्ञांनी एकत्रित काम करण्याचे गरज असल्याचे त्यांनी सांगितले.सहसमन्वयक डॉ. जयवंत गुंजकर यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठात सुरु असलेल्या विविध संशोधन प्रकल्प व विविध उपक्रमांची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ अर्पिता तिवारी-पांड्ये यांनी केले. यावेळी आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. अमृतकुंवर रायजादे, रुधीर बारदेस्कर, कृष्णात निर्मळ, संजय जाधव यांच्यासह प्राध्यापक संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!