मोदींकडून विकसित भारताचे स्वप्न साकार : खासदार धनंजय महाडिक 

 

कोल्हापूर: नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा दबदबा तर वाढलाच, शिवाय समाजातील प्रत्येक घटकाला कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला. गेल्या १० वर्षात देशातील २५ कोटी कुटुंबं दारिद्रय रेषेवर आली. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार होत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केले. कुडित्रे येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.करवीर तालुक्यातील कुडित्रे येथे पश्चिम पन्हाळा भाजप नूतन पदाधिकारी नियुक्ती आणि बांधकाम कामगारांचा मेळावा पार पडला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महेश जाधव, विजय जाधव, दत्तात्रय मेडसिंगे, डॉ के.एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील सत्ताधारी भाजप सरकारमुळे विकासाचा रोडमॅप सत्यात उतरत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक वाढवलाय. समाजातील प्रत्येक घटकाला उपयुक्त जनकल्याणाच्या योजना राबवल्या. मुलभूत सोयी-सुविधांसह ठोस धोरण राबवून, पंतप्रधान मोदी यांनी भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ४०० पेक्षा अधिक जागा निवडून येतील, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. तर समरजित घाटगे यांनीही पंतप्रधान मोदी यांच्यामुळे युवक, शेतकरी, महिला आणि गरीब माणूस यांच्यासाठी अनेक योजना आणल्याचे सांगितले. मोदी पंतप्रधान झाले आणि साखर कारखान्यांची आयकरातून मुक्तता झाली. इथेनॉल निर्मिती, त्याला हमी भाव, कर्जाचे पुनर्गठण करून आर्थिक आधार यामुळे शेतकर्‍यांच्या मालकीचे साखर कारखाने वाचले, असे समरजितसिंह घाटगे म्हणाले. यावेळी राहूल देसाई, महेश जाधव, विजय जाधव, मंदार परितकर यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी सरपंच जोत्स्ना पाटील, सुशिला पाटील, रेखा पाटील, भयाजी गावडे, सुनिल कणेकर, संजय पाटील, हनमंत लांडगे, भगवान निरुके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!