राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या तपासणीत न्यू पॉलिटेक्निकच्या तीन कोर्सेसना मान्यता

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल, सिव्हिल व इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग या तपासणीसाठी अर्ज केलेल्या तिन्ही कोर्सेसना राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) नवी दिल्लीच्या समितीकडून ८ ते १० मार्च रोजी झालेल्या तपासणीत तीन वर्षांची मान्यता प्राप्त झाली. सदर तपासणी प्रक्रियेत मंडळाने निश्चित केलेल्या नऊ कठोर निकषांमधील सर्वच बाबींचे सखोल व काटेकोर मुल्यांकन केले गेले. तपासणी समितीत देशपातळीवरील प्रथितयश अभियांत्रिकी संस्थांच्या उच्चपदस्थ शिक्षणतज्ञांचा समावेश होता.

“औद्योगिक व व्यावसायिक संस्था आणि माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून आमचे प्राध्यापक परिणामाधारित शिक्षण, विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन या पातळीवर प्रशंसनीय कामगिरी करत आहेत. विद्यार्थी उद्योगस्नेही होण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, पूरक कोर्सेस व व्यावसायिक व्यासपीठ यांची तपासणी समितीने विशेष दखल घेतली. एनबीए समन्वयक प्रा. अभिजीत वालवडकर यांच्यासोबत सर्व विभागप्रमुख, शैक्षणिक समन्वयक, रजिस्ट्रार, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांनी एकसंघ होवून दिलेल्या व्यापक योगदानातून न्यू पॉलिटेक्निकने ही उच्चतम क्षमता गाठली आहे. या प्रक्रियेत संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, चेअरमन डाॅ. के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण आणि संचालक मंडळ यांचे पाठबळ लाभले. पुढील टप्प्यात उर्वरित कोर्सेसच्या मान्यतेची प्रक्रिया राबवली जाईल”, असे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
“अमेरिका, युरोपियन देश, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, भारत आदींचा समावेश असलेल्या जगभरातील २३ सदस्य राष्ट्रांच्या संघाने सहमती दिलेल्या वाशिंग्टन ॲकाॅर्डमधील मानकांशी सुसंगत असे एनबीएचे मुल्यांकन असल्याने न्यू पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांना जगातील नामांकित विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी आणि अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठीचा मार्ग सुकर झाला आहे”, अशी माहिती संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी दिली.
“गेली ४० वर्षे तंत्रशिक्षण क्षेत्रात दीपस्तंभ ठरलेल्या न्यू पॉलिटेक्निकच्या उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या कटिबद्धतेची ही पोचपावती आहे”, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे यांनी केले.अभ्यासक्रमातील कमतरता भरून काढण्यासाठीचे प्रभावी उपक्रम, अनुभवी शिक्षकांच्या मुशीत घडलेल्या विद्यार्थ्यांच्या ठायी असलेली शैक्षणिक गुणवत्ता; नवीनतेची क्षमता; उद्योगपूरक कौशल्ये व दृष्टिकोन, संबंधित सर्व घटकांना सोबत घेवून संस्थेची ध्येयाच्या दिशेने होत असलेली वाटचाल या बाबींची प्रशंसा एनबीए तपासणी समितीच्या चेअरमन यांनी केल्याचे डाॅ. दाभोळे यांनी सांगितले.
देशातील तंत्रशिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यात नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिटेशन (राष्ट्रीय मान्यता मंडळ) ही स्वायत्त संस्था प्रभावशाली ठरत आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, व्यवस्थापन, वास्तूविद्या, औषधनिर्माण, हाॅटेल व केटरिंग व्यवस्थापन अशा तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी एनबीएचा भर आहे. नॅककडून संस्थेचे मुल्यांकन केले जाते, तर एनबीएकडून संस्थेतील विविध अभ्यासक्रमांना कठोर निकषांवर आधारित मान्यता दिली जाते.असे दाभोळे यांनी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेस चेअरमन के. जी. पाटील, नितीन पाटील, बाजीराव राजीगरे, संग्रामसिंह पाटील, विक्रम गवळी, सुहासचंद्र देशमुख, दिपक जगताप व संदिप पंडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!