हमीदवाडा कारखाना विकल्याचा आरोप १०० टक्के खोटा ;पालकमंत्री हसन मुश्रीफ

 

कागल :हमीदवाडा साखर कारखाना कर्नाटकातल्या व्यक्तीला विकल्याचा आरोप १०० टक्के खोटा आहे. राजकारणासाठी किती बदनामी आणि अपप्रचार करणार? असा संतप्त सवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. १०० टक्के खोट्या बातम्या पेरून मुद्दामहून शाहू महाराजांच्या विरोधात विधाने करावीत, असा तर हेतू नाही ना? त्यामुळे ; शाहू महाराजांची प्रतिमा डागाळली जाईल. अशी कोणतीही कृती करू नका, असा सल्लाही मंत्री मुश्रीफ यांनी दिला आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले,” काल एका दैनिकात हमीदवाडा कारखाना विकलाय अशी शंभर टक्के खोटी बातमी छापून आली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मी अध्यक्ष आहे. बँकेचे त्या कारखान्यावर कर्ज आहे, कारखाना बँकेला तारण आहे. त्यामुळे तसे असते तर त्या विषयाची माहिती मला झालीच असती. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, यावर्षीच्या हंगामात सर्वप्रथम एफ.आर.पी. देणारा हमीदवाडा हा जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना आहे. याच्यावर कळस म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या म्हणजेच आजच्या अंकात महालक्ष्मी दूध संघ विकला, हमिदवाडा साखर कारखानाही विकावा लागेल, अशा आशयाची विधाने प्रसिद्ध करून कालच्या प्रकारावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हमिदवाडा साखर कारखाना विकलेला नाही, हे त्यांनीच मान्य केलेले आहे.”
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ” महालक्ष्मी दूध संघ बंद झाल्यानंतर लोकसभेच्या तीन निवडणुका झाल्या. त्यामुळे विरोधक महालक्ष्मी दूध संघ बंद असल्याचे सांगून शिळ्या कढीलाच ऊत आणत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ आणि वारणा दूध संघ सक्षम असल्यामुळे त्यांच्यासमोर इतर दूध संघांचा टिकाव लागला नाही. ते बंद झाले. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येताच संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा विरोधक पसरवत आहेत. जगातील कोणतीही शक्ती भारतीय संविधान बदलू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही समाज घटकांनी विचलित होऊ नये.”
यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगरसेवक चंद्रकांत गवळी, अतुल जोशी, नामदेवराव पाटील, नवल बोते, ॲड. संग्राम गुरव, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, बाबासो नाईक, सतीश घाटगे, सागर गुरव, संजय फराकटे, शशिकांत नाईक, संग्राम लाड, अजित निंबाळकर, इरफान मुजावर, पंकज खलिफ, महेश मगर, विक्रम जाधव, सुनील कदम, गंगाराम शेवडे, संदीप भुरले, बाबासो पखाली, अशोक वड्ड, नवल बोते, सुनील माळी, अर्जुन नाईक, रणजीत बन्ने, विवेक लोटे, बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!