छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या नंतर त्यांच्या कार्याचा वसा छत्रपती राजाराम महाराज यांनी अखंडित सुरू ठेवला.. राजश्री शाहू महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवत शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणली.. पण त्याच छत्रपती राजाराम महाराजांच्या नावावर सुरू असलेल्या कसबा बावड्यातील शाळेच्या प्रांगणात असलेला छत्रपती राजाराम महाराजांचा संस्थाकालीन पुतळा हटवण्याचे आघोरी पाप माजी पालकमंत्र्यांच्या संस्थेने केले.. गादी मान याच निवडणुकीत का आठवला? छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढताना गादीचा अपमान झाला नाही काय? असा खडा सवाल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कसबा बावडा येथील सभेत उपस्थित केला.

महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारात कसबा बावडा येथील भगवा चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी, कसबा बावड्यातील 1430 ई वॉर्ड या जागेत संस्थान काळात छत्रपती राजाराम हायस्कूलची स्थापना करण्यात आली होती. या शाळेचा ताबा माजी पालकमंत्र्यांच्या बगलबच्च्यांकडे आहे. या शाळेच्या परिसरातील बांधकामाचे नूतनीकरण करताना छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढण्यात आला. तो आजपर्यंत बसवता आला नाही. हा गादीचा अपमान नाही काय? गादीचा अपमान या नावाने टाहो फोडणाऱ्यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या हटविलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी नवीन पुतळा बसवण्याची तजवीज केली नाही यासारखी शकुनी बुद्धी फक्त माजी पालकमंत्री यांच्यातच आहे. दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिनानिमित्त शिवसेनेने रु.३५ लाखांचा निधी देवून कसबा बावड्यामध्ये विद्युत खांबावर तिरंगा कलरची कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली. स्वातंत्रदिनानिमित्त बावड्यात घरोघरी जिलेबी वाटप करून बावडावासीयांच्या आनंदात सहभागी झालो. याचदिवशी भगवा चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याची घोषणा आम्ही केली. सध्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम सुरु आहे. आम्ही पुतळा उभारण्याची घोषणा केली नसती त्या ठिकाणी दुसराच पुतळा उभारला गेला असता. बावडावासियांचा मसीहा असल्याचा मुखवटा घातलेल्या माजी पालकमंत्र्यांनी आय.आर.बी.ची सुपारी घेवून रस्त्यासाठी बावड्यातील शेतकऱ्यांचा उभा ऊस कापला. तेव्हा बावड्यातील बळीराजावर अन्याय करत असल्याची जाणीव झाली नाही काय? डेअरी आणि सोसायटीच्या माध्यमातून सर्वसामान्य बावडावासीयांवर दबावाखाली ठेवण्यात येते. आगामी काळात शिवसेना बावड्यात नव्याने डेअरी स्थापन करून कसबा बावडावासियांना जाचातून बाहेर काढू. कृषि महामंडळाची हजारो एकर जमीन बावड्यातील शेतकऱ्यांना समसमान वाटप करून शेतकऱ्यांना न्याय देवू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी विधान परिषद उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक सुनील जाधव, प्रदीप उलपे, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख अमोल माने, किशोर घाटगे, शिवसेना वैद्यकीय कक्ष शहर संघटक कृष्णा लोंढे, किसन खोत, पांडुरंग लोंढे, सचिन पोवार, रोहन उलपे, आदर्श जाधव, सचिन पाटील, राजू काझी, कपिल पोवार, सुरज सुतार , धवल मोहिते यांच्यासह भागातील नागरिक, महिला, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!