केवळ 570 ग्रॅम वजनाच्या नवजात अर्भकाला उषःकालमध्ये जीवनदान

 

उषःकाल अभिनव हॉस्पिटलमध्ये 570 ग्रॅम वजनाच्या नवजात बालकाला जीवदान देण्यात आले. प्रसुती तज्ञ, नवजात शिशु तज्ञ व इतर सुपर स्पेशलिटी डॉक्टरांच्या टीमच्या प्रयत्नांनी इतक्या कमी वजनाचे बाळ गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून सुखरूपपणे डिस्चार्ज होण्याचा पश्चिम महाराष्ट्रातील हा अत्यंत दुर्मिळ प्रसंग आहे.उषःकाल अभिनव हॉस्पिटलमध्ये 73 दिवसांपूर्वी 570 ग्रॅम वजनाच्या नवजात बालकाला सिझेरिन सेक्शनद्वारे जन्म देण्यात आला. या नवजात बालकाच्या आईला उच्च रक्तदाब आणि शुगर असल्यामुळे अवघ्या साडेसहाव्या महिन्यात या बालकाला त्याच्या आईने जन्म दिला. बाळ 570 ग्रॅमचे असल्यामुळे एन. आय. सी.यु. मध्ये ठेवण्यात आले. बाळाचे फुफ्फुस, हृदय, मेंदू , आतडी व इतर अवयव नाजूक असल्यामुळे त्याला पेटीत ठेवण्यात आले. फुफ्फुसास श्वास नलिकेद्वारे सरफेक्टंट इंजेक्शन दिले व नवजत बालकास कृत्रिम श्वासाच्या मशीनद्वारे व्हेंटिलेटर वर चार आठवडे ठेवण्यात आले. श्वास बंद पडणे, वारंवार रक्त व रक्तगट चढवावे लागले, नळीतून अत्यंत त्याला संथरितीने दूध देण्यात आले. नवजात शिशूच्या दृष्टीपटलाला सूज आल्यानंतर त्यावर ती देखील योग्य उपचार करण्यात आले. बाळाच्या मेंदूची व हृदयाची वारंवार सोनोग्राफी तपासण्या करण्यात आल्या, योग्य ते उपचार करून मेंदूतील रक्तस्राव व सूज रोखण्यात आली. सोबतच नवजात बाळाला इतर आवश्यक असणारे उपचार देण्यात आले.

अशा नवजात बाळांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते व जंतुसंसर्ग धोका जास्त असतो. उषःकाल येथील प्रशिक्षित प्रसुती व नवजात शिशू तज्ञ डॉक्टर व स्टाफ यांनी अत्यंत काळजीपूर्वक व योग्य उपचार करून १ किलो 300 ग्रॅम वजन झाल्यानंतर आईकडे या नवजात बालकाला सुखरूप सुपूर्द करण्यात आले.या केसमध्ये प्रसुती तज्ञ डॉ. भाग्यश्री चितळे, नवजात शिशु तज्ञ डॉ. विनायक पत्की , डॉ, विनया सारंगकर, डॉ महिंद्र रुगे, बालहृदय तज्ञ डॉ. श्रीकांत माने, नेत्ररोग तज्ञ डॉ दीप्ती कुलकर्णी व रेडिओलॉजी विभागाचे डॉ. भरतकुमार मुडलगी या सर्वांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली.डॉ. विनायक पत्की म्हणाले, गेली दोन वर्षे उष:कालमध्ये अशा कित्येक कमी वजनाच्या व कमी दिवसांच्या नवजात अर्भक तसेच अत्यंत गंभीर अवस्थेतील लहान बालकांना यशस्वी उपचार करून जीवदान देण्यात आले आहे.उषःकाल हॉस्पिटलचे मॅनेजिंग डिरेक्टर डॉ. मिलिंद परीख म्हणाले, उषःकाल मधील एन. आय. सी. यु. आणि पी.आय.सी. यु. हे पश्चिम महाराष्ट्रात अत्यंत नामांकित व यशस्वी विभाग ठरत आहे. माता व बालक विभागातील स्पेशलिस्ट, सुपर स्पेशालिस्ट कन्सल्टंट टर्शरी केअर ट्रीटमेंट अत्यंत गुणवत्तापूर्ण पद्धतीने कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!