रंकाळा तलावातील म्युजिकल फाऊटेनसाठी रु.५ कोटींचा निधी

 

कोल्हापूर  : कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाची गेल्या अनेक वर्षात दुरावस्था झाली होती. कोल्हापूर शहरास भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा रंकाळा तलावास आवर्जून भेट देतो. त्यामुळे या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन होण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यास पुन्हा यश मिळाले असून, नगरविकास विभागाकडून रंकाळा तलाव येथे म्युजीकल फाउंटेन उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने रु.५ कोटी निधीस मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले कि, कोल्हापूर शहरास इ.स. काळापासून ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे. श्री अंबाबाई मंदिरासह कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव हे देशभरातील लाखो पर्यटकांना आकर्षित करणारे प्रेक्षणीय स्थळ आहे. या तलावाचा इ.स.८०० ते ९०० च्या कालावधीपासूनचा इतिहास पहावयास मिळतो. कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा रंकाळा तलाव म्हणजे “कोल्हापूरची चौपाटी आणि कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह” म्हणून ओळखला जातो. रंकाळा तलावाचे संवर्धन व सुशोभीकरणासाठी गेल्या तीन वर्षात एकूण रु.२५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत मंजूर झालेला म्युजिकल फाऊटेन उभारण्यासाठी रु.५ कोटींचा निधी मिळाला आहे नगरविकास विभागाच्या माध्यमातून रु.५ कोटी निधी मंजूर केला आहे. यामध्ये रंकाळा टॉवर परिसराकडे तलावाच्या मध्यभागी ५० मीटर परिघाचे आकर्षक विद्युत रोषणाई ध्वनिप्रणालीसह पाण्याचे कारंजे बसविण्यात येणार आहेत. यामध्ये विविध आकाराचे संगीत फवाऱ्यासह विशेषतः कोल्हापूरच्या सुवर्ण इतिहासाचे छाया-प्रतिबिंब या संगीत कारंजाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहेत. यामुळे आगामी काळात रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडणार असून, पर्यटन वाढीसाठी याचा उपयोग होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!