
कोल्हापूर / प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्यावतीने नुकतीच मधुरिमा राजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. याआधी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचे नुकतेच जाहीर केले होते. त्याप्रमाणे राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु ऐनवेळी एका रात्रीत नगरसेवकांच्या नाराजीमुळे उमेदवार बदलण्यात आला. आणि मधुरिमा राजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तरच्या अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभेसाठी अर्ज भरला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यमान आमदार असणाऱ्या जयश्री जाधव यांना विश्वासात घेतले नाही. उमेदवार निश्चित होण्याकरिता मुलाखत द्यावी लागते. ती सुद्धा मी दिली होती. तरी देखील माझा विचार त्यावेळी केला नाही. परंतु राजेश लाटकर यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याच वेळेला या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे असे ठरवले होते. परंतु अचानक उमेदवार बदलून मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना देण्यात आली नव्हती. दुसऱ्या दिवशी अर्ज भरायला या. असा निरोप मिळाल्यामुळे मला विश्वासात घेतले नाही. मला महिला सक्षमीकरण आणि समाजकारण करायचे आहे. कोणतेही पद नसताना किंवा कोणत्याही प्रकारचा निधी जर उपलब्ध नसेल तर ते करता येत नाही. त्यामुळेच शिंदे गटात प्रवेश केला असे विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यापुढे म्हणाल्या, अडीच वर्षे चंद्रकांतअण्णा काम करत होते. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळून मी विजयी झाले. मलादेखील दोन वर्ष काम करण्याची संधी मिळाली. हा कालावधी काम करण्यासाठी खूप कमी आहे. कोल्हापूरचे अजून अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. जे मार्गी लावायचे आहेत. अजून पाच वर्षे आम्ही थांबू शकत नाही.
विद्यमान आमदारांना डावलले गेले. समाजकारण पुढे राहावे तसेच लाडकी बहीण, महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या क्षेत्रात काम करण्यासाठी एका कुशल नेतृत्वाची आवश्यकता कोल्हापुरात होती. कोल्हापूरात शिवसेना बळकट करणे हाच उद्देश असल्याने जयश्री जाधव यांची शिवसेना उपनेत्या पदी निवड करण्यात आली असल्याचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी आमच्याबरोबर खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर बरोबर होते आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः हा निर्णय घेतला असल्याचे देखील संजय मंडलिक यांनी सांगितले.
आमच्या कार्यकर्त्यांशी आमची तीन दिवस चर्चा सुरू होती. कार्यकर्त्यांकडूनच तुम्ही कोणती भूमिका का घेत नाही? अशी विचारणा होत होती. दीर्घकाम करण्यासाठी आम्हाला पद आणि निधीची आवश्यकता लागणार आहे.महाविकास आघाडीची आम्हाला खूप मदत झाली आहे. बंटी पाटील हे भावासारखे पाठीशी उभे राहिले आहेत. राजघराण्याशी आमचे चांगले संबंध आहेत. आमचे कोणाशीच कसलेच मतभेद नाहीत. कोणाशी वैर नाही. आम्ही त्यांना कुठेही सोडून गेलेले नाही. फक्त महायुतीत असल्यामुळे दिलेली जबाबदारी पार पाडणार आहे. महायुतीच्या उमेदवारांना आम्हाला मदत करावी लागणार आहे. पक्षावर आम्ही शेवटपर्यंत विश्वास ठेवला होता. परंतु कोणताही संवादच न झाल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे सत्यजित जाधव यांनी सांगितले.
Leave a Reply