
राहुल गांधींवर लोकांचा विश्वास नाही; संविधान बदलू शकत नाही: खासदार रामदास आठवले
कोल्हापूर /प्रतिनिधी : संविधान बदलू शकत नाही. घटनादुरुस्ती होऊ शकते. नवीन कायदे येऊ शकतात. परंतु संविधान बदलणार असा अपप्रचार काँग्रेसचे नेते राहुल गांधी गावोगावी जाऊन करत आहेत. राहुल गांधींवर आता देशातील लोकांचा विश्वास नाही अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली.
काँग्रेस पक्ष हा आंबेडकरांच्या देखील विरोधातच होता. दहा टक्के आरक्षणाचा मोदींचा हा निर्णय क्रांतिकारक असून या आरक्षणाचा फायदा सर्व जाती धर्मातील लोकांना घेता येणार आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या विरोधात मोदी सरकार आहे अशा काँग्रेसच्या अपप्रचाराला लोकांनी बळी पडू नये. ज्यांच संविधानावर प्रेम आहे, ज्यांचे देशावर प्रेम आहे अशा मुस्लिमांना आमचा पाठिंबा आहे. त्यांना देशात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. भारत देश हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात आहे अशा काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडू नये, असा सज्जड इशारादेखील खासदार आठवले यांनी दिला. लाडकी बहीण, शेतकऱ्यांना कर्जमाफी, दलितांच्या प्रश्नांकडे संपूर्णपणे लक्ष गेल्या दहा वर्षात भाजप सरकारने दिलेले आहे. तसेच जनधन योजना, मुद्रा योजना, उज्वला योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध माध्यमातून भारत विकासाच्या दिशेने जात आहे. मराठा समाजाला हे ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही. यावरती नरेंद्र मोदी योग्य तो मार्ग काढतील. सर्व जाती-धर्माच्या एकत्रीकरणामुळेच आज देशात मोदींची सत्ता आहे. असे देखील खासदार आठवले यांनी आवर्जून सांगितले. यावेळी कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर, उत्तम कांबळे यांच्यासह आठवले गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply