
कोल्हापूर : कोल्हापूर शहर हे कला, क्रीडा आणि कुस्तीपंढरी म्हणून तसेच “फुटबॉल पंढरी” ही म्हणून ओळखले जाते. आपल्या शहरातील फुटबॉल खेळाला सुमारे १०० पेक्षा अधिक वर्षांची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे फुटबॉल खेळला जातं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक फुटबॉल संघ शहरात आहेत. येथील फुटबॉल खेळाडू आणि खेळाच्या विकासासाठी आगामी काळात कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारली जाईल, असे प्रतिपादन कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर केले.राजारामपुरी येथे आयोजित फुटबॉल प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमीसाठी सरकारकडे यापूर्वीच प्रस्ताव सादर करण्यात आला असून यासाठी शेंडा पार्क येथे जागेची मागणीही करण्यात आली आहे. कोल्हापुरात फुटबॉलचा देशात कोलकत्ता नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रेक्षक वर्ग आहे. परंतु, सुसज्ज मैदान, तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि फुटबॉलसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने कोल्हापूरसह आसपासच्या भागातील फुटबॉल खेळाडूंच्या प्रशिक्षणावर आणि खेळावर मर्यादा येत आहेत. यामुळे अनेक फुटबॉलपटू स्थानिक संघापुरते मर्यादित राहिले आहेत. काही खेळाडू पुणे, मुंबई, गोवा, कलकत्ता आदी ठिकाणच्या नामांकित क्लबकडून खेळतात. बाहेर जाणार्या खेळाडूंना कोल्हापुरातच सुसज्ज मैदान आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण प्राप्त होण्यासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू घडावेत यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. कोल्हापुरात फुटबॉल अकॅडमी उभारण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे. याबाबत मी सातत्याने ते सरकारकडे पाठपुरावा करत असून लवकरच या प्रयत्नांना यश येईल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.राजेश क्षीरसागर यांच्यातर्फे दरवर्षी “राजेश चषक फुटबॉल स्पर्धे”चे आयोजन करून खेळाडूंना भरघोस बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात येते. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत श्री रावणेश्वर मंदिर ते टेंबे रोडपर्यंत फुटबॉल स्ट्रीट विकसित झाला असून या कामासाठी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कोल्हापुरात आंतराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभी रहावी यासाठी महायतीचे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी धनुष्यबाण चिन्हा समोरील बटण दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केले.
Leave a Reply