
कोल्हापूर: कोल्हापुरातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची महाराष्ट्र स्वाभिमान सभा जनतेच्या प्रचंड गर्दीत संपन्न झाली. याप्रसंगी खासदार शाहू छत्रपती महाराज, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष बजरंग पुनिया जी, डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम,आमदार हसन मौलाना, आमदार जयंत आसगांवकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. परंतु खोटे बोलण्यात माहीर आहेत. लोकांच्या अपेक्षा ते पूर्ण करू शकत नाहीत. महाराष्ट्रात निवडणुकीच्या चार महिने आधी लाडकी बहिणी योजना आणली. आणि एकीकडे महागाई वाढवली. माता-भगिनींना घर चालवणे अवघड झाले. पैसा आणि जातीच्या आधारावर मते मिळतात असा मोदींचा गैरसमज आहे. लोकांच्या मुख्य गरजांवर ते चर्चा करत नाहीत. महाराष्ट्रासह देश अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. बेरोजगारी वाढत चालली आहे. महागाई वाढत चालली आहे.मोठे मोठे प्रकल्प गुजरातमध्ये नेले जात आहेत. पंडित नेहरूंवर ते टीका करतात परंतु आरक्षण हे नेहरुंनी सुरू केले. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे तेथे सर्व योजना व्यवस्थित सुरू आहेत. परंतु भाजप त्याचा अपप्रचार करत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आणि आपले भविष्य मजबूत करण्यासाठी डोळे उघडून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोल्हापूरची काँग्रेस परिवाराचे जुने नाते आहे असे देखील प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी उपस्थित प्रचंड जनसमुदाय निवडणुकीत मिळणाऱ्या यशाची साक्ष देत होता.या सभेस इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांसह माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, अंजली निंबाळकर, सौ. मधुरीमाराजे छत्रपती, शिवसेनेचे संजय पवार, अरूणभाई दुधवाडकर, विजय देवणे, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भारती पोवार, कॉ. चंद्रकांत यादव, कॉ. अतुल दिघे, डी.जी भास्कर, शिवाजीराव परुळेकर, बाबुराव कदम यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार यांच्यासह आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply