
कोल्हापूर : कोल्हापूरचे नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरते. या वाढदिवसानिमित्त शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार सामाजिक कार्याची किनार देत शिवसैनिकांकडून विविध उपक्रमांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदाचा वाढदिवस आमदार राजेश क्षीरसागर आणि समस्त शिवसैनिकांसाठी दुग्धशर्करा योग ठरला आहे. कालच विधानसभेच्या निवडणुकीत राजेश क्षीरसागर यांनी २९ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवीला. त्यामुळे निकालाचा आणि वाढदिवसाचा जल्लोष शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कोल्हापूर येथे कालपासूनच पहायला मिळत आहे.आज मुंबईसाठी जावे लागणार असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री १२ वाजताच आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. यावेळी राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिक, हितचिंतकांसमवेत केक कापून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. रात्री उशिरापर्यंत शिवालय येथे आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूरच्या जनतेने, महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मला एक दिवस आधीच वाढदिवसाची अनोखी भेट दिली असून, ही भेट आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील. कोल्हापूरवासीयांनी दाखविलेल्या प्रेमाचे ऋण कामाच्या माध्यमातून फेडण्यासाठी मी तत्पर असेन. येणाऱ्या काळात कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेवून कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली.
.
Leave a Reply