नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

 

नवी मुंबई: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) याचे उद्घाटन केले. हा देशातील सर्वात महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांपैकी एक असून भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील एक निर्णायक टप्पा ठरला आहे.या प्रसंगी पंतप्रधान म्हणाले, “मुंबईचा अनेक वर्षांचा प्रतिक्षेचा क्षण आज पूर्ण झाला आहे. आता मुंबईला तिचा दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संपूर्ण या परिसराला आशियातील सर्वात मोठा कनेक्टिव्हिटी हब बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.”ते पुढे म्हणाले, “हे विमानतळ ‘विकसित भारत’ या संकल्पनेचे जिवंत उदाहरण आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर उभे आहे आणि त्याचे कमळ-प्रेरित डिझाइन आपल्या संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हे विमानतळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट युरोप आणि मध्य पूर्वेतील सुपरमार्केट्सशी जोडेल, ज्यामुळे आपल्या शेतकरी, मच्छीमार आणि बागायती उत्पादकांचा ताजा माल जागतिक बाजारात जलद पोहोचेल. तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वाहतूक खर्च कमी होईल आणि नव्या गुंतवणुकी व उद्योगांसाठी संधी निर्माण होतील. महाराष्ट्र आणि मुंबईतील सर्व नागरिकांना या विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल मी हार्दिक शुभेच्छा देतो.”
उद्घाटनापूर्वी पंतप्रधानांनी विमानतळाचा दौरा केला आणि अत्याधुनिक सुविधा पाहिल्या. या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किन्जरापू, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अदाणी एअरपोर्ट्सचे संचालक जीत अदाणी उपस्थित होते. पंतप्रधानांनी विमानतळाचा मास्टर प्लॅन आणि तांत्रिक वैशिष्ट्येही पाहिली.
सार्वजनिक–खासगी भागीदारीचे उत्कृष्ट उदाहरण – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एक उल्लेखनीय सार्वजनिक–खासगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत विकसित करण्यात आले आहे. हा भारताच्या पायाभूत विकासाच्या दृष्टीकोनाला आणि ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेला मूर्त रूप देतो.अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी म्हणाले, “हा केवळ एक विमानतळ नाही, तर भारताला जागतिक प्रवेशद्वार म्हणून उभे करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर आजच्या गरजा पूर्ण करत असतानाच, पुढील अनेक दशकांसाठी संधी निर्माण करते. हा विमानतळ केवळ प्रवाशांना नव्हे, तर एका उभरत्या महासत्तेची धडधड, स्वप्ने आणि आकांक्षा घेऊन पुढे जाईल.”अदाणी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेडचे संचालक जीत अदाणी म्हणाले, “एनएमआयए हा भारताच्या विमान वाहतूक प्रवासातील एक माइलस्टोन आहे, जो आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी अनुभवाचा सुंदर संगम आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूरक ठरून मुंबईला जागतिक एव्हिएशन हब म्हणून अधिक मजबूत करतो.”एनएमआयए हे मुंबई महानगर प्रदेशासाठी ट्विन एअरपोर्ट सिस्टीमचा एक भाग आहे. प्रारंभी हे विमानतळ दरवर्षी २ कोटी प्रवासी हाताळण्याच्या क्षमतेसह सुरू होईल आणि भविष्यात ९ कोटी प्रवाशांपर्यंत विस्तारेल. या विमानतळाचे डिझाइन कमळाच्या आकारातून प्रेरित असून, ते भारताच्या सांस्कृतिक मुळांना आणि आधुनिक तंत्रज्ञान दृष्टिकोनाला जोडते. झाहा हदीद आर्किटेक्ट्स यांनी तयार केलेले हे बांधकाम नैसर्गिक प्रकाश, ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरणीय शाश्वतता लक्षात घेऊन तयार केले आहे.
स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि मल्टी–मॉडल हब
एनएमआयएला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू), नवी मुंबई आणि मुंबई मेट्रो, उपनगरी रेल्वे नेटवर्क तसेच प्रस्तावित जलमार्गांशी जोडले गेले आहे. या नेटवर्कमुळे पश्चिम भारतातील प्रवासी आणि मालवाहतुकीचे संपूर्ण व्यवस्थापन अधिक सुलभ आणि वेगवान होईल. प्रारंभिक दोन टप्प्यांत हे विमानतळ एका धावपट्टी आणि एका टर्मिनलसह २० एमपीपीए क्षमतेसह सुरू होईल. पुढील टप्प्यांत चार धावपट्ट्या, अनेक टर्मिनल्स आणि अत्याधुनिक कार्गो सुविधा उभारल्या जातील, ज्यामध्ये नाशवंत वस्तू आणि एक्सप्रेस कार्गोसाठी स्वतंत्र टर्मिनल्सही असतील.

One response to “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन”

Leave a Reply to z777gameapk Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!