कोल्हापूर कॅन्सर सेंटरला डिजिटल मॅमोग्राफी मशिन प्रदान

 

कोल्हापूर: कोल्हापूर कॅन्सर सेंटर मधून आजवर अनेक कॅन्सर रूग्णांना संजीवनी मिळाली आहे. नव्या अत्याधुनिक मशिनमुळे कॅन्सरचे अचुक निदान करणे शक्य होईल. त्यामुळे रूग्णांवर वेळेत उपचार करता येतील. कॅन्सर तपासणीसाठी जिल्हाभर आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने कोल्हापूर कॅन्सर सेंटरला डिजिटल मॅमोग्राफी मशिन प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या प्रयत्नातून, रोटरी फौंडेशनच्यावतीने प्रोजेक्ट लक्ष्य अंतर्गत डिजिटल मॅमोग्राफी मशिन उपलब्ध करण्यात आले आहे. सुमारे ५३ लाख रूपये किंमतीचे हे मशिन, कोल्हापूर कॅन्सर सेंटरला प्रदान करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक, सौ. अरूंधती महाडिक, रोटरीचे माजी डिस्ट्रीक्ट गर्व्हनर शरद पै, सचिव बी एस शिंपुकडे, नासीर बोरसादवाला यांच्या उपस्थितीत हे मशिन प्रदान करण्यात आले. प्रारंभी रोटरीचे पदाधिकारी आणि विविध व्यक्तींचा सत्कार झाला. दुर्दैवाने गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढत असून, वेळीच रोग निदान झाले तर तातडीने उपचार करता येणे शक्य आहे. त्यासाठी हे मॅमोग्राफी मशीन उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील अनेक व्यक्ती विशेषत: महिला, शारिरीक तक्रारींकडे किंवा रोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटरने जिल्हाभर आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित करावीत, महाडिक परिवार त्यासाठी सहकार्य करेल, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. तर ब्रेस्ट कॅन्सरचे निदान अचुकपणे आणि वेळेत व्हावे, यासाठी हे मशिन उपयुक्त ठरेल, रोटरी मिडटाऊन क्लबचे सहकारी आणि रोटरी फौंडेशनच्या माध्यमातून कोल्हापुरात हे मशीन आल्याने कॅन्सर विरूध्दची लढाई अधिक प्रभावीपणे होईल, असे सौ. अरूंधती महाडिक म्हणाल्या. दरम्यान रोटरी अध्यक्ष पदाच्या कालावधीत सौ. अरूंधती महाडिक यांनी केलेल्या अनेक उल्लेखनीय कार्यापैकी हा एक उपक्रम असून, सर्वसामान्य रुग्णांना डिजिटल मॅमोग्राफीचा फायदा होऊन त्यांची कॅन्सरपासून मुक्तता होईल, असे रोटरीचे माजी डिस्ट्रीक्ट गर्व्हनर शरद पै यांनी सांगितले. ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर मंथ म्हणून साजरा केला जातो. याच महिन्यात रोटरीच्या वतीने प्रदान झालेल्या डिजिटल मॅमोग्राफी मशीनचा गरजू रुग्णांसाठी फायदा होईल, असे डॉ. सूरज पवार म्हणाले. डॉ. रेश्मा पवार यांच्यासह रोटरीच्या पदाधिकार्‍यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, गौरी शिरगावकर, रितू वायचळ, केतन मेहता, सिद्धार्थ पाटणकर, विकास राऊत, पद्मजा पै, नरसिंह जोशी, रोटरीचे गर्व्हनर सिध्दांत पाटणकर, अध्यक्ष केतन मेहता, सचिव विकास राऊत यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

One response to “कोल्हापूर कॅन्सर सेंटरला डिजिटल मॅमोग्राफी मशिन प्रदान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!